एका दिवसात ६ हजार वाहनांवर कारवाई करून १६ लाखांचा दंड वसूल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ट्रिपल सीट जाणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या ३० विभागांनी आणि ४४ पोलीस ठाण्यांतील पोलिसांनी विशेष मोहिम राबवून १४५४ वाहनचालकांवर कारवाई केली. त्याचबरोबर सर्व प्रकारचे वाहतूक नियमभंग करणाऱ्या ५ हजार ९२१ वाहनांवर कारवाई करून १६ लाख १८ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांमुळे त्यांच्या जीवाला धोका असतो, तसेच इतरांच्या जीवाला देखील धोका निर्माण होतो. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शहरातील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील रस्त्यांवर मंगळवारी ट्रिपल सीट वाहनांवर विशेष मोहिम राबविण्यात आली.
वाहतूक शाखेचे ३० विभाग तसेच सर्व ४४ पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकारी व अंमलदार या मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेत ट्रिपल सीट जाणाऱ्या १४५४ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
त्यांच्याकडून २ हजार १४४ चलने भरून घेण्यात आली. त्यातून १६ लाख १८ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय इतर नियमभंगाबाबत ५ हजार ९२१ चलनांची कारवाई करण्यात आली.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित व शिस्तबद्ध वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले.
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांचे समुपदेशन – दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या आठवड्यात समुपदेशन बैठक घेतली होती. पुन्हा दारू पिऊन वाहन चालविताना आढळल्यास वाहन जप्त करून वाहन परवाना निलंबित करण्याचा इशारा देण्यात आला होता. वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईबरोबरच त्यांना मार्गदर्शन व समुपदेशन शिबिराला हजेरी लावावी लागणार आहे. ट्रिपल सीट व इतर मोटार वाहन नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात बुधवारी मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी त्यांचे समुपदेशन केले.















