एक लाख रुपयांची चंदनाची लाकडे, हत्यारे पकडली: सिंहगड रोडवरील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : चंदन तस्कर रात्री-अपरात्री टोळक्यांसह येऊन चंदनाची झाडे चोरून नेतात. त्यात मधे कोणी आले, तर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. पुणे शहरात अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. धायरी परिसरातील चंदनाचे झाड तोडून त्याची लाकडे घेऊन जाणाऱ्या सराईत चोरट्याला सिंहगड रोड पोलिसांनी पकडले.
भरत शिवाजी जाधव (वय ३४, रा. केडगाव चौफुला, गडदेवस्ती, ता. दौंड) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून अर्धवट तोडलेले चंदनाच्या झाडाचे तुकडे आणि झाडे कापण्यासाठीची हत्यारे असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शिवाजी क्षीरसागर यांना माहिती मिळाली की, वडगाव येथील प्रयेजा सिटीसमोर कॅनॉलजवळ एक संशयित व्यक्ती पोत्यामध्ये झाडे कापण्यासाठीची हत्यारे घेऊन थांबला आहे.
मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, एक जण खांद्यावर पांढऱ्या रंगाचे पोते घेऊन आडबाजूला थांबलेला दिसला. त्याला ताब्यात घेऊन पोत्यात पाहिले असता, एक लाख रुपयांचे अर्धवट तोडलेले चंदनाच्या झाडाचे तुकडे आणि झाडे कापण्यासाठीची हत्यारे मिळाली.
चंदनाच्या झाडाच्या तुकड्यांबाबत विचारले असता, त्याने १६ जानेवारी रोजी मानस धायरी परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली.भरत जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यवत आणि हवेली पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे दिलीप दाईगडे, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारू, अण्णा केकाण, अमोल पाटील, विनायक मोहिते, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडुळे, विकास बांदल आणि स्वप्निल मगर यांनी केली आहे.
