सीबीएसई टॅक्स नावाने खोट्या नोंदींमधून फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या तरुणाने बनावट नोंदी करत, भागीदारांचा विश्वास संपादन करून जेनिसिस इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला तब्बल २ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी जिनेंद्र दिलीप दोषी (३८, रा. योगी पार्क, कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी योगेश पोपट नवले (३६) आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
ही फसवणूक फेब्रुवारी २०१४ पासून कोरेगाव पार्क येथील कंपनीच्या कार्यालयात सातत्याने सुरू होती. पोलिसांच्या माहितीनुसार, जेनिसिस इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे कार्यालय कॅनॉट प्लेस येथे आहे. या ठिकाणी योगेश नवले अकाउंटंट म्हणून काम करत होता.
त्याने कंपनीच्या भागीदारांचा विश्वास जिंकून सर्व आर्थिक व्यवहार हाताळण्याची जबाबदारी मिळवली होती. मात्र, या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने सीबीएसई टॅक्स नावाने खोट्या नोंदी तयार केल्या.
कंपनीच्या अॅक्सिस बँक खात्यावरून वेळोवेळी दोन कोटी रुपये स्वत:च्या आणि नातेवाईकांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. ही रक्कम परत न करता त्याने कंपनीची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे करत आहेत.
