ट्राफिक कमी कसे होणार?
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसगाड्यांची संख्या कमी असल्याने पुण्यातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) फक्त निम्म्याहूनही कमी बस रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांना दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर करावा लागतो. परिणामी, वाहतूक कोंडीला अधिक चालना मिळत आहे.
इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट पॉलिसी (आयटीडीपी) या संस्थेच्या अहवालानुसार, पुणे शहरात सार्वजनिक वाहतूक सुरळीत आणि प्रवासी केंद्रित होण्यासाठी किमान ४,५०० बसगाड्या आवश्यक आहेत. मात्र, सध्या उपलब्ध बसगाड्यांची संख्या केवळ २,००० आहे.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवली जाते. शहरीकरणाचा वेग वाढला असताना, पीएमपीकडील बसगाड्यांची संख्या त्यामानाने कमी आहे. त्यामुळे प्रवाशांना लांब पल्ल्याचा प्रवास करताना अतिरिक्त वेळ आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वाढत्या खासगी वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. अनेक नागरिकांना १० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल एक तास रस्त्यावर अडकून रहावे लागते.
डिसेंबर २०२४ मध्ये आयटीडीपीने केलेल्या अभ्यासानुसार, राज्यातील शहरी भागांमध्ये जवळपास २८,८०० बसगाड्यांची गरज आहे. केंद्र सरकारच्या २०१२ च्या पंचवार्षिक योजनेनुसार, २ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये संघटित सार्वजनिक वाहतूक असणे आवश्यक आहे.
परंतु राज्यातील ३० शहरे आजही बससेवांपासून वंचित आहेत. सध्या १४ शहरेच पालिकांच्या बससेवा पुरवतात. बसगाड्यांची संख्या वाढवण्याशिवाय वाहतूक कोंडीचे संकट दूर होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे अत्यावश्यक आहे.
