महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : जयराज ग्रुपचे संचालक आणि सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आदी क्षेत्रांत आपले विशेष योगदान देणारे सुप्रसिद्ध व्यापारी राजेश शहा यांना अमेरिकेतील प्रसिद्ध ‘कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी, यूएसए’ कडून सामाजिक उद्योजकतेसाठी मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले.
कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधींनी, शहा यांचे कौतुक करताना असे म्हटले की, “सामाजिक उद्योजकतेतील त्यांच्या अनोख्या योगदानामुळे विविध समुदायांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडून आले आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी समाजात प्रेरणादायी कार्य केले आहे.”
व्यवसायात प्रचंड यशस्वी असले तरी, राजेश शहा सामाजिक कार्यातही कायम अग्रेसर आहेत. त्यांच्या पुढाकाराने पुण्यात उभारलेले गुजरात भवन – जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटर हे भारतातील एकमेव भव्य केंद्र ठरले आहे. तीन वर्षांपूर्वी सुरु झालेले अत्याधुनिक PGKM विद्याधाम (बॅगलेस आणि डे स्कूल) हे त्यांच्याच नेतृत्वाखाली उभारण्यात आले आहे.
गुजरातमधील मूळगावी पेढामली (ता. विजापूर, जि. मेहसाणा) येथे त्यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ ‘कंचन-हिरा आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि कॅन्सर रिसर्च सेंटर’ उभारले आहे. ६० बेड्स असलेल्या या अत्याधुनिक रुग्णालयात केवळ १० रुपये फी आकारली जाते.
जनरल वॉर्डमध्ये मोफत उपचार आणि भोजन दिले जाते. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी ‘मोबाईल मेडिकल सेवा’ सुरू करण्यात आली आहे, ज्यामधून रुग्णांना आणणे-नेणे मोफत केले जाते.
राजेश शहा यांना फेअर बिझनेस प्रॅक्टीसेससाठी जमनालाल बजाज पुरस्काराने तीन वेळा सन्मानित करण्यात आले आहे.
याशिवाय समाज परिवर्तन, समाजरत्न, आदर्श व्यापारी, जीवनगौरव, व्यापारभूषण, राष्ट्रीय ऐक्य, कर्मवीर, बेस्ट बिझनेसमन अशा विविध पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले आहे.
त्यांचा लाडू-चिवडा उपक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदला गेला आहे.
शहा हे दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे चेअरमन, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे अध्यक्ष, आणि श्री पूना गुजराती बंधू समाजाचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. ते पुना मर्चंट्स चेंबरचे सुवर्ण महोत्सवी वर्षातील अध्यक्ष, तसेच फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) चे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. त्यांचा समाजसेवेतील सक्रिय सहभाग अनेक संघटनांमध्ये असून ते जनसेवा फाउंडेशनचे खजिनदार आहेत.
