सहकारनगर पोलिसांची मोठी कामगिरी: पाच लाखांचा ऐवज हस्तगत, दोन चैन चोरीचे गुन्हे उघड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मकर संक्रांतीच्या दिवशी दुचाकीवरून येत महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या दोन आरोपींना सहकारनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत सात तोळे सोने आणि एक मोपेड दुचाकी, एकूण ५,३०,००० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
दि. १४ जानेवारी २०२५ रोजी दुपारी एक च्या सुमारास त्रिमूर्ती चौक ते गुलाबनगर जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादी रस्ता ओलांडत असताना, गोकुळ बंगल्याच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावरून आलेल्या दुचाकीवरील दोघा अनोळखी इसमांपैकी मागे बसलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून जबरदस्तीने चोरून नेले. या प्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
दि. १८ जानेवारी २०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील व तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी इंवॉन आयटी पार्क, खराडी येथील हनी स्मोकर पानटपरीसमोर थांबले होते. लगेचच पोलीस पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. संशय येताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, मात्र त्यांना तातडीने अटक करण्यात आली.
रितेश अंबादास जाधव (वय २६, रा. चंदननगर, पुणे), तरुण बलराम झा (वय २५, रा. खराडी, पुणे, मूळ रा. दरभंगा, बिहार) अशी आरोपीची नावे आहेत. आरोपींनी तपासादरम्यान कबुली दिली की, त्यांनी धनकवडी भागात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारून चोरी केली होती. या कबुलीनंतर गुन्हा उघड झाला. संपूर्ण तपासादरम्यान आरोपींकडून सात तोळे सोने, ५,३०,००० रुपये किमतीचा ऐवज आणि एक मोपेड दुचाकी जप्त करण्यात आली.
या यशस्वी कारवाईचे मार्गदर्शन अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) स्मार्तना पाटील, आणि सहायक पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) राहुल आवारे यांनी केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, सागर सुतकर, किरण कांबळे, बजरंग पवार, योगेश ढोले, महेश भगत, अमित पदमाळे, बालाजी केंद्रे, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, आणि खंडु शिंदे यांनी सहभाग घेतला.

















