पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होत राहणार : पत्रकार परिषदे मध्ये माहिती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात गेल्या वर्षभरात पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली असली तरी त्यावर आपण समाधानी नाही. सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. अवैध धंद्यांबाबत झिरो टॉलरन्स ची आमची भुमिका असून ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध्य धंदे चालतील तेथील पोलीस निरीक्षकाच्या बदल्या केल्या जातील. असे मत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.
११२ वरील रिस्प्रॉन्स टाईम सध्या ७ मिनिटे आहे, तो ५ मिनिटांवर आणण्याचा प्रयत्न आहे. त्याबरोबर नवी मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही अत्याधुनिक सायबर लॅब असावी, यासाठी प्रस्ताव पाठविल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. पुणे शहरातील वार्षिक गुन्ह्याचा आढावा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला.
यावेळी त्यांनी शहरात २०२४ मधील गुन्हे आणि पोलिसांनी केलेली कारवाई यांची माहिती देतानाच २०२५ मधील संकल्पही जाहीर केले. खून, खूनाचा प्रयत्न यामध्ये २०२३ च्या तुलनेत ९ व २४ टक्क्यांनी घट झाली आहे. घरफोडींच्या घटनेत १३ टक्क्यांनी घट झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे प्राधान्याने नोंदवून घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहे. अत्याचाराच्या प्रकरणात १२०० फिर्यादी पीडित महिलांना आधार देण्यासाठी पोलिसांचे भरोसा सेल त्यांच्या संपर्कात आहे.
सोनसाखळी चोरट्यांवर जरब बसविण्यासाठी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. अवैध धंदे चालविणार्या आणि जमिनीचा बेकायदेशीर ताबा मारणार्या खंडणीखोरांची गय केली जाणार नाही. वर्षभरात वारसा हक्काने व खेळाडु अशा २३ जणांना परवाना देण्यात आला आहे.
२०० शस्त्रधारकांना नोटिसा
२०२२ मध्ये २७९ आणि २०२३ मध्ये १८६ आणि जानेवारी २०२४ मध्ये ४२ जणांना शस्त्र परवाने देण्यात आले होते. २०२४ मध्ये १११ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले असून २०० शस्त्रधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
अत्याधुनिक सायबर लॅब
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. सायबर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक सायबर लॅब पुण्यातही असावी, यासाठी गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्याचबरोबर विशिष्ट रक्कमेच्या सायबर गुन्ह्यांचा प्राधान्याने तपास करण्याचा निर्णय येणार आहे.
फसवणुकीबाबत १५ दिवसात निर्णय
आर्थिक गुन्हे तसेच पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या तक्रारी येतात. अशा तक्रारीबाबत चौकशी महिनोनमहिने सुरु असल्याच्या तक्रारी येत आहेत. या फसवणुकीच्या तक्रारी दिवाणी आहे की फौजदारी याचा निर्णय पोलीस १५ दिवसात देतील़ दिवाणी स्वरुपाची तक्रार असेल तर त्याबाबत तक्रारदाराला १५ दिवसात कळविले जाईल. फौजदारी तक्रार असेल तर त्याचा तपास करुन गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस लवकरात लवकर करतील, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
- वर्षभरात १०३ गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन राज्याच्या वेगवेगळ्या कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध
- शहरात दहशत पसरवणार्या संघटित गुन्हेगारी करणार्या टोळ्यांवर जरब बसविण्यासाठी ३४० गुंडावर मोक्का कारवाई करण्यात आली.
- ११२ वरील प्रतिसाद वेळ ७ मिनिटांवरुन ५ मिनिटांवर आणण्याचा प्रयत्न
- गस्त घालणारी जुनी बीट मार्शल सिस्टिम बदलणार, तिचा कंट्रोल गुन्हे शाखेकडे येणार
- अवैध धंद्यांबाबत झिरो टॉलरन्स असणार
- अल्पवयीन गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी ‘मिशन परिवर्तन’
- शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी ‘मिशन निर्धार’ अभियान राबविण्यात येत आहे.
