सायबर पोलिसांनी वेशांतर करून केली चौघांना अटक : ३० लाख केले जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : देशभरात मालवाहतूक करणाऱ्या नामांकित कंपनीतील कारकूनानेच मित्राच्या मदतीने कंपनीच्या गुगल शीटमध्ये फेरफार करून खऱ्या व्हेंडरच्या बँक खात्याची माहिती बदलून कंपनीची ५५ लाख ५४ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिसांनी वेशांतर करून चौघांना अटक केली आहे.
आकाश गायकवाड (रा. ए. जे. पाटीलनगर, सोलापूर), शिवानंद तळवडे (रा. विजापूर रोड, सोरेगाव, सोलापूर), कंपनीतील कारकून उमेर शेख (रा. लक्ष्मीनगर, येरवडा) आणि त्याचा मित्र सोन्या ऊर्फ आकाश परीट (रा. म्हाडा कॉलनी, नागपूर चाळ, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वडगाव शेरी येथील मालवाहतूक करणाऱ्या एका नामांकित कंपनीला २१ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ दरम्यान कोणीतरी कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कट करून कंपनीच्या व्हेंडरच्या कामाच्या पेमेंट संदर्भात असलेल्या गुगल शीटच्या लिंकमध्ये कंपनीच्या दिल्ली येथील खर्या व्हेंडरच्या बँक खात्याची माहिती बदलून सायबर चोरट्याने स्वत:चे बँक खाते क्रमांकाची माहिती टाकून गुगल शीट कंपनीला ऑनलाईन दाखल केली.
दाखल केलेली माहिती ही खऱ्या व्हेंडरने पाठवलेली आहे, असे कंपनीच्या फायनान्स विभागास भासवून फायनान्स विभागाला बँक खाते कंपनीच्या सिस्टीममध्ये जोडण्यास भाग पाडले. खऱ्या व्हेंडरला मालवाहतुकीबाबत ट्रान्सफर करावयाचे पेमेंट ५५ लाख ५४ हजार ९९९ रुपये हे चोरट्याच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यास लावून कंपनीची फसवणूक केली होती.
६ जानेवारीला कंपनीच्या व्यवस्थापकाने तक्रार सायबर पोलिसांकडे दाखल केली. कंपनीच्या गुगल शीट लिंकबाबत तांत्रिक विश्लेषण करून तसेच पैसे ट्रान्सफर झालेल्या बँक खात्याबाबतची माहिती घेतल्यावर आरोपी सोलापूर येथे असल्याची माहिती मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम, पोलीस अंमलदार नवनाथ कोंडे, संदीप पवार, दिनेश मरकड हे सोलापूरला रवाना झाले. आकाश गायकवाड व शिवानंद तळवडे या दोन आरोपींना वेशांतर करून ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी मालवाहतूक करणाऱ्या नामांकित कंपनीतील कारकून उमेर हमीद शेख याने त्याचा मित्र सोन्या ऊर्फ आकाश राजू परीट याच्या मदतीने कंपनीच्या गुगल शीटमध्ये फेरफार करून पैसे काढल्याचे कबूल केले. ती रक्कम सर्वांनी वाटून घेतली.
येरवड्यातून उमेर शेख व आकाश परीट यांना अटक केली. आकाश गायकवाड याला यातील तांत्रिक ज्ञान होते. सायबर पोलिसांनी या चौघांकडून ३० लाख रुपये हस्तगत केले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम, पोलीस अंमलदार नवनाथ कोंडे, संदीप पवार, दिनेश मरकड, मुंढे यादव, नागटिळक यांनी केली आहे.
