आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्रतिष्ठित सीएसआर हिरोज पुरस्काराने प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया सन्मानित

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • February 7, 2025
Spread the love

पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आणि बन्सी रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठित सीएसआर हिरोज अवार्ड २०२५ ने सन्मानित करण्यात आले. ४ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे झालेल्या भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला मेघश्रेय फाउंडेशनच्या संस्थापक आणि विश्वस्त तसेच अल्केम लॅबच्या प्रवर्तक सीमा सिंग, बजाज फाउंडेशनचे चेअरमन शिशीर बजाज, निमिष माहेश्वरी, सूर्यदत्त ग्रुपच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

सीएसआरच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या कंपन्यांचे संचालक, संस्था आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या परोपकारी, दानशूर व्यक्तींचा सन्मान राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आला.

या सन्मानित व्यक्तींमध्ये सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या संचालिका सारा तेंडुलकर, जेएसडब्ल्यू फाउंडेशन, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स, एल अँड टी ग्रुप, टाटा मोटर्स, एसबीआय फाउंडेशन, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, क्रॉम्प्टन अँड ग्रीव्हज, ग्रँट मेडिकल फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी पुरस्कार स्वीकारले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया हे अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असून, जात, धर्म, आर्थिक-भौगोलिक परिस्थिती तसेच लिंग विचारात न घेता समाजातील सर्व स्तरांपर्यंत शिक्षण पोहोचावे, यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांच्या प्रेरणेतून अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे २५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रायोजकत्व मिळाले आहे.

त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. गरजू आणि पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, महिलांसह रेलवे कुली, ऑटोरिक्षा चालक अशा ५०० हून अधिक जणांना शिक्षणाची संधी देणे, दुर्गम भागातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करणे, आरोग्य व शैक्षणिक शिबिरे राबवणे, तसेच फूड बँक, क्लोदिंग बँक, नॉलेज बँक, ब्लड बँक आणि स्टार्टअप इनक्यूबेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवणे यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.