पुणे रेल्वे स्थानकावरील भार होणार कमी : डिसेंबरअखेर काम पूर्ण होण्याची शक्यता
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता प्रवासी भार कमी करण्यासाठी खडकी येथे स्वतंत्र रेल्वे टर्मिनल विकसित करण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. हे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पुण्यातून नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आवश्यक प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे.
दररोज पुणे रेल्वे स्थानकावरून सुमारे २०० गाड्यांची ये-जा होते, तसेच दीड लाखांहून अधिक प्रवासी येथे प्रवास करतात. पुणे हे अत्यंत वर्दळीचे टर्मिनल असल्याने नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. याच कारणास्तव हडपसर आणि खडकी येथे नवीन टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला होता.
गेल्या वर्षी हडपसर टर्मिनलच्या कामाला सुरुवात झाली होती. त्याठिकाणी प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात आली असून, सध्या तेथून एक रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. खडकी येथे रेल्वे टर्मिनल विकसित करण्यासाठी ३७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत नव्याने एक प्लॅटफॉर्म विकसित केला जाणार आहे, तसेच दोन स्टेबलिंग लाइन तयार करण्यात येणार आहेत.
प्रवाशांच्या सुविधांसाठी विविध कामे हाती घेतली जाणार आहेत. सध्या पुणे-लोणावळा मार्गावरील काही लोकल गाड्या शिवाजीनगर येथून सुटतात, भविष्यात त्यातील काही गाड्या खडकी रेल्वे स्थानकावरूनही सुरू करता येतील. तसेच, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या खडकीवरून सुरू करून पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महत्त्वाची वैशिष्ट्ये:
खडकी टर्मिनल विकसित करण्याचे काम सुरू
नव्याने एक प्लॅटफॉर्म तयार केला जाणार
प्लॅटफॉर्म क्रमांक एकची उंची वाढविली जाणार
पादचारी पुलाचा विस्तार करण्यात येणार
