पुणे महापालिकेकडून पुणेकरांना दिलासा, सलग ९ वर्षांत वाढ नाही
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेच्या २०२५-२६ या वर्षाच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मान्यता दिली. या अर्थसंकल्पात मिळकत करात कोणतीही वाढ न करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने स्वीकारला आहे. सलग नवव्या वर्षी मिळकत करात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. जुने दर जैसे थे असणार आहेत.
अर्थसंकल्पात मिळकत कर विभागाला २७२७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत २०१० कोटी रुपयांची मिळकत कर वसुली झाली आहे. उर्वरित दोन महिन्यांत ७०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.
पुणे महापालिकेने यापूर्वी २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात १६ टक्के करवाढ केली होती. त्यानंतर गेल्या ८ वर्षांत कोणतीही करवाढ झालेली नाही. २०१७ मध्ये पालिकेत ११ गावांचा समावेश झाला. तसेच २०२१ मध्ये आणखी २३ गावांचा समावेश केल्याने महापालिकेच्या मिळकत कराच्या उत्पन्नात वाढ होत गेली आहे.
४० टक्के सवलत कायम
मिळकत कर आकारणीत दिल्या जाणाऱ्या सवलतीही कायम असणार आहेत. त्यात नागरिक स्वतः राहत असल्यास निवासी मिळकतीस ४० टक्के सवलत, वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या पत्नी, आईच्या स्वतः राहत असलेल्या मिळकतीस दिल्या जाणाऱ्या सवलती, शहरातील राष्ट्रपती पदक मिळालेल्या व्यक्तींच्या मिळकतीच्या सवलती कायम असणार आहेत.
शहरातील एकूण मिळकती (जुनी हद्द)
निवासी – १२.०५ लाख
बिगर निवासी – १.५८ लाख
मोकळ्या जागा – २९,८०८
मिश्र जागा – २५,७५७
एकूण मिळकती – १४.१९ लाख
