गुगलवरील बनावट वेबसाईटवर विश्वास ठेवल्याने नुकसान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ‘अमूल’चे आयस्क्रीम पार्लर आणि रिटेल एजन्सी मिळवण्यासाठी गुगलवर शोध घेतलेल्या एका तरुणाची सायबर चोरट्यांनी २० लाख ४२ हजार रुपयांना फसवणूक केली. बनावट वेबसाईटवर माहिती भरल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले. औंध येथील २७ वर्षीय तरुणाने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तरुण हॉस्टेल चालवतो आणि त्याला आयस्क्रीम पार्लर व रिटेल व्यवसाय सुरू करायचा होता. गुगलवर शोध घेतल्यावर त्याला “AMUL INDIA FRANCHISE” नावाची वेबसाईट आढळली. ती खरी असल्याचे समजून त्याने आपली माहिती नोंदवली.
यानंतर एका व्यक्तीकडून फोन आला आणि पार्लर व रिटेल एजन्सी मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला रजिस्ट्रेशनसाठी ३१०० रुपये आणि ५५०० रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट, साधनसामग्री, खाद्यपदार्थ, फर्निचर आणि करारासाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मोठ्या रकमा मागण्यात आल्या.
तरुणाने एकूण २० लाख ४२ हजार रुपये भरले, तरीही कोणतेही साहित्य मिळाले नाही. त्याने पैसे परत मागितल्यावर टाळाटाळ सुरू झाली. त्यावेळी त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी महत्त्वाच्या सूचना
– गुगलवरील वेबसाईटवर पूर्ण विश्वास ठेवू नका.
– कोणालाही माहिती न घेता पैसे पाठवू नका.
– मोठ्या कंपन्या फ्रेंचायझी देण्यासाठी अधिकृत प्रक्रिया वापरतात.
– स्थानिक अधिकृत विक्रेत्यांकडे चौकशी करा.
– वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगणाऱ्यांपासून सावध राहा.
