पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांची बिबवेवाडी, आंबेगाव, मार्केटयार्डमधील गुंडांवर कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केटयार्ड या तीन पोलीस ठाण्यांच्या परिसरात दहशत माजविणाऱ्या ९ गुंडांना पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी २ वर्षांसाठी शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरातील जालिंदर मसा मोरे (वय ४८, रा. अप्पर इंदिरानगर), अण्णा ऊर्फ गणराज सुनील ठाकर (वय २६, रा. अप्पर बिबवेवाडी), ओंकार लक्ष्मण सणस (वय २३, रा. बिबवेवाडी), राजू महादेव डेंगळे (वय २२, रा. सुखसागर नगर), आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार आकाश गुलाबराव कांबळे (वय २१, रा. शनिनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द; मूळ रा. लक्ष्मीनगर, परभणी), कृष्णा बबन लोखंडे (वय २४, रा. शनिनगर, आंबेगाव), आर्यन बापू बेलदरे (वय २४, रा. आंबेगाव बुद्रुक) तसेच मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार सोमगौडा गुरन्ना चौधरी (वय ३३, रा. मार्केटयार्ड) आणि साहिल भिमा अष्टगे (वय २०, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केटयार्ड) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या गुन्हेगारांविरुद्ध बेकायदेशीर हत्यार वापरणे, दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, मारहाण करणे, बेकायदेशीरपणे घरात घुसणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दंगा करणे, दरोड्याची तयारी करणे, इतरांचे जीवन धोक्यात आणणारी कृती करणे, दहशत माजविणे, जबरी चोरी करणे, लैंगिक अत्याचार करणे, अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगणे, घरफोडी करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा न झाल्याने त्यांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.















