आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मोबाईलमुळे सुताराचा खून उघडकीस

Spread the love

आंबेगाव पठार येथील तोरणा मोहर बिल्डिंगजवळ बांधकाम सुरू असलेल्या साईटच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एकाच्या डोक्यात वार करून खून करण्यात आला, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली.

मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तेथील कामगारांकडूनही कोणतीही उपयुक्त माहिती मिळाली नाही, त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटविणे कठीण झाले होते.

त्या खोलीत रक्ताने माखलेला एक मोबाईल पोलिसांना आढळला. त्यावरून मृताची ओळख पटविण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी यांना दिल्या.

रक्ताने माखलेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केल्यावर नयन प्रसाद याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणातून नयन प्रसाद आणि बिरण करकर यांचा एकत्र फोटो मिळाला. तसेच, हे दोघे त्या खोलीत राहत असल्याची खात्री झाली. त्यामुळे बिरण करकर यानेच नयन प्रसाद याचा खून केल्याचे स्पष्ट झाले.

तो पश्चिम बंगालला पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश पवार आणि अभिनय चौधरी यांनी पश्चिम बंगालला जाऊन शोध घेतला. त्यावेळी आरोपी हावडा रेल्वे स्टेशन परिसरात सापडला. त्याला पश्चिम बंगालमधील हावडा येथील गोलाबारी पोलीस ठाण्यात १२ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.