तिघा भामट्यांनी ज्येष्ठ नागरिक महिलेला १ लाख ६० हजारांचा गंडा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सकाळी फिरायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेला फसवून १ लाख ६० हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना विमाननगर येथे घडली. चोऱ्या वाढल्या आहेत, दागिने रुमालात बांधून ठेवा, असा सल्ला देऊन भामट्यांनी महिलेच्या दागिन्यांऐवजी रुमालात दगड ठेवून तिला फसवले.
या प्रकरणी ६४ वर्षांच्या महिलेने विमानतळ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ही घटना विमाननगरमधील शुभ गेटवे सोसायटीच्या बाहेरील फुटपाथवर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सकाळी नियमितप्रमाणे फिरायला बाहेर गेल्या होत्या. त्या परत सोसायटीच्या गेटजवळ आल्या असताना तिघेजण त्यांच्याजवळ आले. त्यांनी महिलेला “आजकाल चोर्या वाढल्या आहेत, दागिने काढून ठेवा” असे सांगितले.
महिलेने सुरुवातीला दुर्लक्ष केले, मात्र त्यांनी पुन्हा आवाज देत दागिने काढण्यास भाग पाडले. त्यानुसार, महिलेने चार तोळ्यांचे मंगळसूत्र (किंमत १ लाख ६० हजार रुपये) काढून रुमालात ठेवले. त्या भामट्यांपैकी एकाने रुमाल व्यवस्थित बांधून महिलेच्या हाती दिला.
महिला सोसायटीच्या आत गेल्यानंतर तिने रुमाल उघडून पाहिला असता त्यात दागिन्याऐवजी दगड असल्याचे आढळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन करीत आहेत.
