खडकी पोलिसांनी पतीला केली अटक, घटस्फोटीत पत्नीला भेटत असल्याचा संशयावरुन भांडणे
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : घटस्फोट झाला असताना पहिल्या पत्नीला भेटत असल्याच्या संशयावरुन दुसरी पत्नी भांडत असते. या भांडणाला कंटाळून पत्नी झोपली असताना तिच्या तोंडावर गळ्यावर ब्लँकेट दाबून तिचा खुन केल्याच्या प्रकार समोर आला आहे. रात्री ११ वाजता पत्नीचा खुन केल्यानंतर पती रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारी बसून होता. त्यानंतर सकाळी ८ वाजता त्याने ही बाब पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन कळविली. खडकी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
बिंदु दिलीप कंडाथील (वय ५३, रा. ओरियन कॉम्प्लेक्स, चिखलवाडी, खडकी) असे खुन झालेल्या पत्नीचे नाव आहे. दिलीप नंबुरी कंडाथील (वय ५६) असे खुन करणाऱ्या पतीचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार विलास फुलसिंग राठोड (वय ३०) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंदु ही नेहमी डिप्रेशनमध्ये असून तिच्यावर उपचार सुरु होते. त्यातूनच बिंदु हिला नेहमी संशय होता की, आपला पती दिलीप हा पहिल्या घटस्फोटीत पत्नीला भेटतो. या संशयावरुन ती नेहमी भांडण करत असते.
एका बाजूला व्यवसायातील कर्जबाजारीपणा आणि दुसरीकडे पत्नीचे रोजचे भांडण यामुळे दिलीप कंडाथील हे कंटाळून गेले होते. त्यातून पत्नी झोपली असताना २४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता त्यांनी तिच्या तोंडावर ब्लँकेट टाकून तिचे नाक, तोंड दाबले. त्यात श्वास गुदमरुन तिचा मृत्यु झाला.
त्यानंतर रात्रभर तो तसाच तिच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. आपणही जीव द्यावा, असा विचार त्याच्या मनात येत होता. परंतु, त्याला धीर झाला नाही. शेवटी सकाळी ८ वाजता त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन आपण बायकोचा खुन केल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त जैतापूरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, सहायक पोलीस निरीक्षक सरोदे, पटेल यांनी घटनास्थळी भेट दिली. शवविच्छेदनात बिंदु हिचा मृत्यु श्वास गुदमरुन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी दिलीप कंडाथील याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक देठे तपास करीत आहेत.
व्यवसायात कर्जबाजारी
दिलीप कंडाथील हे इस्टेट एजंट म्हणून व्यवसाय करतात. या व्यवसायामध्ये नुकसान झाल्याने सध्या ते कर्जबाजारी झाले होते. त्यांची पत्नी बिंदु ही मानसिक आजारी होती. तिच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. ती वेगळी राहते.















