या दिशेने तपास सुरू : सी.आय.डी प्रमुख सुनील रामानंद यांचे निवेदन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन प्रमुख मुद्द्यांच्या दिशेने सीआयडी तपास करत आहे.
या अपघातात घातपात आहे का, रॅश नेग्लिजन्स (बेफिकीरपणा) आहे का आणि गुन्हेगारी कृत्य घडले आहे का, या दिशेने योग्य वेगाने आणि व्यावसायिक पद्धतीने तपास सुरू आहे, असे सीआयडीचे प्रमुख आणि अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सांगितले. आमच्या तपासात अनेक एजन्सींची मदत घेतली जात आहे. फॉरेन्सिक लॅबचीही मदत घेतली जात आहे.
एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अहवाल आल्यानंतर तो या तपासात समाविष्ट करण्यात येईल. या तपासासाठी विविध एजन्सींची मदत घेण्यात येत आहे. याचबरोबर हा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपविण्याबाबत राज्य सरकारने सांगितले आहे.
वेगवेगळ्या एजन्सींचे अहवाल आल्यानंतर त्यांच्या निष्कर्षांचा विचार करून त्यात काही घातपात अथवा गुन्हेगारी कृत्य आढळून आल्यास त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सुनील रामानंद यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांनी विमान कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत बारामती पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. मात्र, या प्रकरणातील अकस्मात मृत्यूचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले.
आमदार रोहित पवार यांच्या मागणीनंतर सीआयडीने तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी सायंकाळी अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले.
















