महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : महाराष्ट्रातील विविध व्यापारी संघटनांची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) ने यावर्षीपासून “फाम बिसनेस एक्सलन्स अवार्ड” या नावाने उद्योग – व्यापार क्षेत्रातील अद्वितीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यास सुरवात केली आहे.
या पुरस्कारांपैकी सर्वाधिक सन्मानाचा पुरस्कार म्हणजे “फाम समाजरत्न पुरस्कार – २०२५” या पुरस्काराने पुण्यातील सुप्रसिद्ध जयराज ग्रुपचे संचालक डॉ. राजेश शहा यांना राष्ट्रीय व्यापारी कल्याण मंडळाचे अध्यक्ष मा. सुनीलजी सिंघी व राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
यावेळी फामचे अध्यक्ष जितेंद्र शहा व सर्व पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (फाम) ने यावर्षीपासून प्रथमच राज्य स्तरावरील विविध पुरस्कार देण्यास सुरवात केलेली आहे.
यामध्ये फाम समाजरत्न पुरस्कार, फाम व्यापाररत्न पुरस्कार, फाम महिला उद्योजक पुरस्कार, फाम युवा उद्योजक पुरस्कार, फाम सर्वश्रेष्ठ एम.एस.एम.ई. पुरस्कार, फाम व्यापारमित्र पुरस्कार, फाम सर्वश्रेष्ठ सहकारी संस्था पुरस्कार, इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे.
“फाम बिसनेस एक्सलन्स अवार्ड – 2025” या पुरस्कारांसाठी विविध १७ व्यवसाय क्षेत्र निर्धारीत करण्यात आली आहेत. या पुरस्कारांचे वैशिष्ठ्ये म्हणजे हे पुरस्कार चालू कार्यक्रमामध्येच घोषीत करण्यात आले आहेत.
त्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. के. ताथेड यांच्या अध्यक्षतेखाली पाच ज्युरींचे पॅनल स्थापन करण्यात आले होते. त्यांनी राज्यभरातून आलेल्या नॉमिनेशनचे अवलोकन करून निष्पक्ष पणे विजेत्यांची नावे चालू कार्यक्रमातच घोषीत केली.
फाम समाजभूषण पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून एकूण ९ नॉमिनेशन प्राप्त झाले होते. त्यामधून ज्युरींनी एकमताने डॉ. राजेश शहा यांना विजेता घोषीत केले. राजेश शहा हे याविषयी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, व्यवसायाच्या ४५ वर्षांच्या वाटचालीत व सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य इत्यादी क्षेत्रात काम करीत असताना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
त्यामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा जमनालाल बजाज पुरस्कार तीन वेळा मिळाला आहे. समाज परिवर्तन, राष्ट्रीय ऐकता पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, व्यापार भूषण पुरस्कार, आदर्श व्यापारी पुरस्कार असे अनेक पुरस्कार आजवर मिळाले आहेत.
परंतू “फाम समाजरत्न पुरस्कार – २०२५” हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष आहे. फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) या संस्थेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष या पदावर मी गेली २५ वर्षे सलग काम करीत आहे.
आज मला “फाम समाजरत्न पुरस्कार – २०२५” ने गौरवण्यात आले हे माझे सौभाग्य आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्या कामाची पोच पावती मिळाली. हा पुरस्कार देऊन फाम ने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे.
राजेश शहा यांना नुकतेच काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे. ते पुण्यातील नावाजलेल्या दि पूना गुजराती केळवणी मंडळ या शैक्षणिक संस्थेचे चेअरमेन आहेत.
तसेच ते एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल चे अध्यक्ष असून श्री पूना गुजराती बंधु समाज या ११० वर्षे पासून कार्यरत संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. पुना मर्चंट चेंबरचे सुवर्ण महोत्सवी वर्षाततील अध्यक्ष, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे महासचिव या पदावर कार्यरत आहेत.
त्याचबरोबर जनसेवा फाऊंडेशन चे खजिनदार आणि पूना हॉस्पिटल चे विश्वस्त म्हणून ते कार्यरत आहेत. याशिवाय अनेक संस्थांच्या विविध पदांवर डॉ. राजेश शहा कार्यरत आहेत.
