आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

संदीप भंडारी जैन आर्थिक महामंडळाच्या समन्वयकपदी

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या समन्वयकपदी भाजपा जैन प्रकोष्ठाचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या नियुक्तीचे मोठे महत्त्व असल्याचे मानले जात आहे.

महामंडळाचे उद्दिष्ट राज्यातील जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी योजना राबवणे हे आहे. यामध्ये विशेषतः अल्पव्याज दराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, जैन तीर्थांचे संरक्षण व संवर्धन, जैन ग्रंथांचे पुनर्लेखन व जतन करणे, तसेच कायम पायी विहार करणाऱ्या जैन साधू-संतांसाठी सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे यासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे.

याशिवाय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल जैन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज योजना राबवण्यावर भर दिला जाणार आहे. महामंडळाच्या माध्यमातून विधवा आणि परित्यक्ता जैन महिलांसाठी विशेष योजनांची अंमलबजावणी केली जाणार असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या सुविधांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली या योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. योजनांची परिणामकारक अंमलबजावणी आणि व्यापक समाज सहभाग वाढवण्यासाठी लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा समित्यांची स्थापना केली जाईल, अशी माहिती संदीप भंडारी यांनी दिली.

समाजातून अभिनंदनाचा वर्षाव या नियुक्तीबद्दल जैन समाजात आनंद व्यक्त केला जात असून, संदीप भंडारी यांचे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व समाजबांधवांनी अभिनंदन केले आहे.