वस्तुस्थितीदर्शक माहिती त्याच दिवशी देऊन करणार खुलासा, राज्य शासनाचा निर्णय
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना, धोरणे, प्रकल्प तसेच राज्यात घडणाऱ्या विविध घटनांबाबत अनेकदा वस्तुस्थितीदर्शक नसलेल्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. आता त्याची शासन त्वरीत दखल घेणार आहे. त्याच दिवशी वस्तुस्थितीदर्शक माहिती पुरवून योग्य खुलासा करण्यात येणार आहे. त्यासाठी माहिती आणि जनसंपर्क विभागात स्वतंत्र विभाग तयार करण्यात येणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या अपूर्ण माहितीच्या प्रसारामुळे विविध ठिकाणी जातीय तणाव निर्माण झाला आहे. अशा बातम्या व घटनांचे गांभीर्य शासनाने विचारात घेऊन त्याची दखल घेतल्यास व त्यावर तातडीने प्रतिसाद दिल्यास शासनाची जनमानसांमधील प्रतिमा उंचावण्यास मदत होईल.
हे लक्षात घेऊन विविध प्रसारमाध्यमांमध्ये राज्य शासनाच्या एकूण कार्यपद्धतीविषयी प्रसिद्ध होणाऱ्या वस्तुस्थितीदर्शक नसलेल्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर राज्य शासनाच्या विभागांकडून तातडीने प्रतिसाद देण्यात येत नाही.
विविध प्रसिद्धी माध्यमांमध्ये राज्य शासनाच्या कार्यपद्धती/ कामकाजासंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांसाठी वस्तुस्थितीदर्शक माहिती संबंधित विभागाकडून तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी सर्व मंत्रालयीन विभागांसाठी एक सविस्तर सूचनात्मक कार्यपद्धती निश्चित करण्याचा विचार शासनाने केला आहे.
वर्तमानपत्रांमध्ये (प्रिंट मीडिया) प्रसिद्ध होणाऱ्या प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांचे संकलन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे केले जाईल. अशा बातम्यांची कात्रणे व मजकूर त्याच दिवशी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या संगणक प्रणालीद्वारे संबंधित विभागाकडे पाठविले जातील.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या खुलासा करण्यायोग्य बातम्यांची दृकश्राव्य फीत संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या सचिवांच्या समूहासाठीही उपलब्ध करून देण्यात येईल. संबंधित विभागांनी प्राप्त झालेल्या बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आपल्या अधीनस्थ कार्यालयांकडून माहिती मिळवावी.
अशा बातम्यांबाबत वस्तुस्थितीदर्शक माहिती किंवा विभागाचे अभिप्राय सचिवांची मान्यता घेऊन, वर्तमानपत्रातील बातमीच्या संदर्भात १२ तासांच्या आत माहिती व जनसंपर्क महासंचालकांच्या शासकीय ई-मेलवर / ई-ऑफिसद्वारे तसेच संबंधित विभागीय संपर्क अधिकाऱ्याकडे पाठवावेत.
सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांसाठी विभागांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती/ अभिप्राय संबंधित विभागाचे मंत्री, राज्यमंत्री, सचिव/आयुक्त किंवा विषयाशी संबंधित अधिकारी यांच्या बाईटसह दोन तासांच्या आत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास तातडीने उपलब्ध करून द्यावी.
महासंचालकांना प्राप्त झालेला खुलासा संबंधित वर्तमानपत्र/ वृत्तवाहिन्या/ डिजिटल मीडियाकडे पाठवून खुलासा प्रसिद्ध करण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करावी. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील बातम्यांसाठी २ तासांत, तर प्रिंट मीडियासाठी १२ तासांच्या आत योग्य तो खुलासा करावा, असे धोरण ठरविण्यात आले आहे.