राज्यात सरासरी 3.81% वाढ : १ एप्रिलपासून लागू झालेले नवे दर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तीन वर्षांनंतर राज्यात रेडीरेकनरच्या दरात सरासरी 3.89% वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीच्या प्रस्तावानुसार नोंदणीकृत व्यवहारांची माहिती ‘एनआयसी’च्या माध्यमातून एकत्र करण्यात आली. त्याचप्रमाणे स्थावर व्यवसाय संकेतस्थळे व जागा पाहणी करून प्रत्यक्ष माहिती संकलित केली गेली आहे.
राज्याच्या ग्रामीण भागात 3.36%, प्रभाव क्षेत्रात 3.29%, नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रात 4.97%, आणि महानगरपालिका क्षेत्रात 5.95% (मुंबई वगळता) दरवाढ करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक वाढ सोलापूर महानगरपालिका हद्दीत 10.17% झाली आहे, तर पुण्यात 4.16% आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 6.69% दरवाढ झाली आहे.
हे नवे दर १ एप्रिल पासून लागू करण्यात आले आहेत, आणि त्यामुळं शासनाच्या महसुलात वाढ होणार आहे. राज्याची सरासरी वाढ 4.39% (मुंबई वगळता) असून, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात 3.39% आणि संपूर्ण राज्याची एकूण वाढ 3.81% आहे.
2022 पासून राज्य शासनाने रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ केली नव्हती. दरवाढीसाठी बांधकाम व्यावसायिक, दस्त लेखनिक यांची मुद्रांक जिल्हाधिकारीस्तरावर बैठक आयोजित करण्यात आली होती.
तसेच, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींशी चर्चा करून सूचना व हरकतींची पडताळणी केली गेली आहे.1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या दरवाढीमुळे पुढील आर्थिक वर्षापर्यंत म्हणजेच मार्च 2026 पर्यंत राज्याच्या तिजोरीत 75 हजार कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेच्या हद्दीत प्रभात रस्ता आणि भांडारकर रस्ता भागात रेडीरेकनरचा सर्वाधिक दर 86,710 रुपये प्रति चौ. मीटर आहे.















