दरोड्याची तयारीसह गंभीर गुन्हे, लोणीकंद पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या जंगल्या ऊर्फ विशाल श्याम सातपुते याच्या टोळीला पोलिसांनी पकडले होते. त्याच्या टोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी ६ महिन्यांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
ऋषिकेश राजेंद्र पवार (वय २२, रा. भैरोबा वसती, कोलवडी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. जंगल्या ऊर्फ विशाल श्याम सातपुते टोळीकडून हडपसर, वाघोली, लोणीकंद परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करत असते.
ऋषिकेश पवार हा या टोळीचा सदस्य आहे. त्याच्यावर सराफी दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचा गुन्हा दाखल होता. याशिवाय अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हेगारीवर वचक रहावा, यासाठी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी या प्रस्तावाची पडताळी करुन ऋषिकेश पवार याला सहा महिने पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश काढला आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस हवालदार प्रशांत कापुरे, शुभम सातव, विजय आवाळे यांनी केली आहे.
