धायरीमधील घटना; आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पतीविरुद्ध गुन्हा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पतीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नांदेड सिटी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मल्लिकार्जुन मयाप्पा चलवादी (वय २६, रा. गजानन संकुल, धायरी) असे गुन्हा दाखल केलेल्या पतीचे नाव आहे. शिल्पा मल्लिकार्जुन चलवादी (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबत भिमाप्पा चौडप्पा चलवादी (वय ५३, रा. किर्तिनी बाग, मुंढवा) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा हिचा पहिला विवाह झाला होता.
पतीने तिला सोडल्यानंतर तिचा मल्लिकार्जुन चलवादी याच्याशी ६ वर्षांपूर्वी विवाह झाला. मल्लिकार्जुन याचे वडील ठेकेदारीच्या व्यवसायात असून, तो वडिलांना व्यवसायात मदत करत होता. पतीकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून शिल्पाने ११ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता साडीने सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड अधिक तपास करत आहेत.
