आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शिवारफेरीचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करा – जिल्हाधिकारी डूडी

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News • April 17, 2025
Spread the love

पुणे : “जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शिवारफेरीचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करावे. त्यात ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांचा सक्रीय सहभाग असावा. नव्याने आढळणाऱ्या व दुरुस्ती आवश्यक असलेल्या कामांची सविस्तर नोंद घेऊन अंदाजपत्रके तयार करावीत,” असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डूडी यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार यासह विविध जलसंधारण उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, “शिवारफेरीच्या माध्यमातून गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन अस्तित्वातील मृद व जलसंधारण संरचनांची पडताळणी करावी. यावेळी नोंद नसलेल्या नव्या संरचनांचीही माहिती घेण्यात यावी आणि ती मोबाईल ॲपमध्ये अचूकपणे भरली जावी.”

याचवेळी लघुसिंचन योजनांची ७ वी प्रगणनाही पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनांतर्गत ६८.६६ लाख घन मीटर गाळ काढण्याच्या २२० कामांना तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

“प्रत्येक प्राप्त प्रस्तावाला तातडीने मान्यता देत कामांना गती द्यावी. या कामांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्थांना तालुक्यानिहाय संधी द्यावी,” असेही ते म्हणाले. अटल भूजल योजनेतर्गत नळपाणी पुरवठा योजनांचे स्रोत बळकट करण्याची कामे हाती घेण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले.

सादरीकरण करताना जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे यांनी सांगितले की, “जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत एकूण ५ हजार ४५५ कामांना ५६ कोटी ३७ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यातील लेखाशीर्षांतर्गत ७९५ पैकी ७४३ कामे पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.”

अभिसरण निधीतून घेतलेल्या ४ हजार ५५३ कामांपैकी सर्वच पूर्ण झाली असून, ५२ कामे सध्या सुरू आहेत. मुख्यमंत्री कृती कार्यक्रमात ५३१ पैकी ३८७ कामे पूर्ण झाली आहेत. गाळमुक्त धरण व नाला खोलीकरण योजनेंतर्गत ४७.७७ कोटींच्या १९६ कामांना मान्यता देण्यात आली असून, यापैकी १३४ कामे पूर्ण झाली आहेत.

या अंतर्गत २९ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. योजनेतील १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत १३८ पैकी १०० कामे पूर्ण झाली असून २० कामे प्रगतीपथावर आहेत. या बैठकीत ‘अमृत सरोवर योजना’, ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक २.०’, ‘जलशक्ती अभियान – कॅच द रेन’ या योजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.