२५ लाखांची लाच न दिल्याने चुकीची ‘क’ प्रत तयार करून जमीन मालकाचे केले नुकसान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर येथील एका जमीन मालकाकडून ५० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक आणि भुकरमापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच दिली नाही म्हणून जमीन मालकास धमकी देत त्यांच्या जमिनीशी संबंधित चुकीची ‘क’ प्रत तयार करून मोठे नुकसान करण्यात आले.
येरवडा पोलिसांनी भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील आणि भुकरमापक किरण येटाळे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीने येरवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, जून २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला.
फिर्यादी व्यक्तीची हडपसर येथील मिळकत २०२३ आणि २०२४ मध्ये भूमी अभिलेख कार्यालयाच्या हवेली विभागामार्फत कायदेशीररीत्या मोजणी झाली होती. मात्र, नंतर हद्द निश्चितीच्या कारणास्तव उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांनी ५० लाख रुपयांची मागणी केली.
त्यानंतर भुकरमापक किरण येटाळे याने “सवलत” देत ही रक्कम २५ लाखांवर आणली. लाच न दिल्यास “हेलिकॉप्टर शॉट” लावून नुकसान करेन, अशी धमकी देण्यात आली.
फिर्यादीने लाच देण्यास नकार दिल्यानंतर, अमरसिंह पाटील यांनी सरकारी नोकर असूनही अधिकारांचा गैरवापर करून, फिर्यादीच्या जमिनीलगत असलेल्या धारकांची चुकीची ‘क’ प्रत तयार केली. यामुळे फिर्यादीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे करत आहेत.
