१३ लाखांचा मुद्देमाल जप्त : गावठी पिस्तूलसह अंमली पदार्थ हस्तगत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत मॅफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, कार व इतर साहित्यांसह अटक केली. आरोपींच्या ताब्यातून एकूण १३ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बार्शी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस.सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल सागर सुरवसे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली. विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळताच त्यांनी ती तत्काळ आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवली.
खात्रीशीर माहितीच्या आधारे, दि. १७ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास परांडारोड येथील पेट्रोल पंपाजवळ एक पांढऱ्या रंगाची टोयोटा कोरोला आल्टीस कार मॅफेड्रॉनसह येणार असल्याचे समजले.
पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या नेतृत्वाखाली स्वराज हॉटेलजवळ सापळा रचण्यात आला. काही वेळातच संबंधित कार दाखल झाल्यानंतर तिला थांबवून झडती घेण्यात आली. कारमध्ये तिघे इसम होते. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून २०.०४ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.), एक गावठी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन, एक इलेक्ट्रिक वजन काटा, एक पांढऱ्या रंगाची टोयोटा कोरोला आल्टीस कार व रोख रक्कम असा एकूण १३,०२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत अंमली पदार्थांसह शस्त्रास्त्रे आणि रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली.या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८(क), २२(ब), २९ तसेच भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी – पोउनि. उमाकांत कुंजीर, सपोफौ. अजित वरप, पोहेकॉ. बाळकृष्ण दबडे, पोहेकॉ. अमोल माने, पोहेकॉ. श्रीमंत खराडे, पोहेकॉ. बाबासाहेब घाडगे, पोना. सागर सुरवसे, पोना. संगाप्पा मुळ, पो.कॉ. अंकुश जाधव, पो.कॉ. सचिन देशमुख, पो.कॉ. प्रल्हाद अकुलवार, पो.कॉ. सचिन नितनात, पो.कॉ. धनराज फत्तेपुरे, पो.कॉ. राहुल उदार, पो.कॉ. इसामिया बहीरे, पो.कॉ. रतन जाधव.
