गुंडाचे नाव न घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दिली धमकी : बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा केला दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दुसऱ्या व्यक्तीशी फोनवर बोलत असताना अचानक फोन घेऊन बोलल्याने, आवाज न ओळखल्याचा राग येऊन गुंडाने आपल्या लहानपणीच्या मित्रावर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना गुंडाच्या साथीदाराने हॉस्पिटलमध्ये येऊन, गुंडाचे नाव घेतल्यास त्रास होईल, अशी धमकी दिली.
याबाबत ओंकार शाहूराज जाधव (वय २५, रा. प्रतिभा निवास, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी देवेन पवार (वय २५, रा. गॅस गोडावूनजवळ, बिबवेवाडी), आदित्य कांबळे (वय २८, रा. वैभव सोसायटी, बिबवेवाडी), आणि मेहुल धोका (वय २९, रा. गोकुळनगर, कात्रज) या तिघांना अटक केली असून त्यांच्या एका साथीदारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बिबवेवाडीतील महेश सोसायटीमध्ये १७ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार जाधव याचे आरोपी देवेन पवार आणि आदित्य कांबळे हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. १६ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता आदित्य कांबळे याचा ओंकार याला फोन आला आणि त्याने “दुकान बंद केले का?” असे विचारले.
त्यावर ओंकारने “हो” असे उत्तर दिले. तेव्हा देवेन पवारने आदित्यच्या हातातून फोन घेऊन शिवीगाळ करत “मी बोलतोय” असे म्हटले. ओंकारने आवाज ओळखला नसल्यामुळे त्यानेही शिवी दिली.
त्यावर देवेन म्हणाला, “मी देवेन पवार, तुझा बाप बोलतोय” असे म्हणत फोन कट केला. यानंतर ओंकारने देवेन पवारला फोन करून “मी आवाज ओळखला नाही” असे सांगितले. ते भारती विद्यापीठाजवळील लोखंडी गेटजवळ भेटले. त्यावेळी देवेन पवारने धमकी देत निघून गेला.
१७ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता ओंकार हा मित्र जय विजय चव्हाण याच्या गाडीवरून जात असताना महेश सोसायटी येथे देवेन पवारने त्याला अडवले आणि कोयत्याने वार केला. तो वार चुकविण्यासाठी ओंकारने डावा हात पुढे केला, मात्र नंतर त्याच्या डोक्यातही कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले.
मित्राने त्याला भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना, पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास देवेन पवारचा मित्र मेहुल धोका हा तेथे आला. त्याने “देवेन पवारविरुद्ध तक्रार करू नकोस, नाहीतर तुला त्रास होईल.
तुझ्या जीवाचे वाईट होईल. तुझा हॉस्पिटलचा खर्च आम्ही देऊ,” अशी धमकी देऊन तेथून निघून गेला.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले करीत आहेत.
