सोन्याची तार घेऊन चोरटे पसार : रविवार पेठेतील गर्दीच्या वेळीची घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मंगळसूत्रासाठी लागणारी सोन्याची बारीक तार रविवार पेठेतील कमल मंडळ गोल्ड येथे देण्यासाठी जात असलेल्या युवकाला अडवून, त्याला मारहाण करून खिशातील ३ लाख रुपयांचे सोने दोघा चोरट्यांनी चोरून नेले.
याबाबत भरत देवाराम मिना (वय १८, रा. रविवार पेठ, मूळ रा. कुलथाना, राजस्थान) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता रविवार पेठेतील तांबोळी मस्जिदकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत मिना हा १५ दिवसांपूर्वी राजस्थानमधून आला होता.
नाना पेठेतील दुकानमालक अरविंद मनोहर सिंह या सोन्याच्या कारागिराकडे तो सोन्याचे दागिने बनवण्याचे काम शिकत आहे. अरविंद सिंह यांनी भरत मिना याला २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता रविवार पेठेतील कमल मंडळ गोल्ड येथे ऑर्डरप्रमाणे तयार केलेली मंगळसूत्रासाठी लागणारी सोन्याची बारीक तार नेऊन देण्यास सांगितले.
त्याप्रमाणे मिना हे सायकलवरून तांबोळी मस्जिदकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना, पावटेकर ब्रदर्स यांच्या दुकानासमोर आले असता, दोन जणांनी त्यांची सायकल अडवली. त्यावेळी सायकल रस्त्यावर पडून त्यांची झटापट चालू असताना, आणखी एक जण आला.
तोही त्यांच्याशी झटापट करू लागला. त्यांना पकडून या मुलांनी त्यांच्या खिशातील ३ लाख रुपयांची सोन्याच्या दोन तारा जबरदस्तीने घेऊन ते पळून गेले. या प्रकाराने घाबरून मिना हे दुकानमालकाकडे जाऊन घडलेला प्रकार सांगितला. हा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे करीत आहेत.
