जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावला १ लाखांचा दंड : उरुळी देवाचीतील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आईला त्रास देत असल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात सख्या भावाच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
निलेश बबन बोरकर (वय ३१, रा. कोंडेवस्ती, उरुळी देवाची, ता. हवेली) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला आहे. ही घटना उरुळी देवाची येथील कोंडेवस्तीमध्ये १९ जानेवारी २०२० रोजी घडली होती. मंगेश बबन बोरकर असे खून झालेल्या भावाचे नाव आहे.
मंगेश बोरकर हा त्याची आई रत्नमाला बबन बोरकर हिला त्रास देत होता. यावरून मंगेश आणि निलेश या भावांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात निलेश याने मंगेशच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केला.
लोणी काळभोर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून निलेश बोरकर याला अटक केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून १७ एप्रिल २०२० रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. त्यांना कोर्ट पेरवी म्हणून ललिता कानवडे यांनी सहाय्य केले. सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने निलेश बोरकर याला जन्मठेप व १ लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी या कामगिरीबद्दल प्रोत्साहन म्हणून कोर्ट पेरवी हवालदार ललिता कानवडे आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांना प्रत्येकी १० हजार रुपये बक्षीस मंजूर केले आहे. गेल्या ४ महिन्यांत लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ६ गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
