नोकरी दिलेल्याच्याच डोक्यात रॉडने २६ वार : पुणे न्यायालयाचा निर्णय
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नोकरी मिळवून देणाऱ्या सहकाऱ्यालाच लोखंडी रॉडने २६ वार करून निर्घृणपणे ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा पुणे सत्र न्यायालयाने सुनावली. आरोपीने कामामध्ये दांडी मारल्यामुळे फटकारल्याच्या रागातून हा खून केला होता.
खून करणाऱ्या आरोपीचे नाव सुरज सुनिल फाळके असून, मृताचे नाव अमोल खडके (रा. कोंढवा) आहे. ही घटना २६ ऑक्टोबर २०२१ रोजी कोंढव्यातील ‘इनोफ्लेक्स लॅमिनेटर्स’ या कंपनीत घडली.
अमोल खडके यांनी सुरज फाळके याला कंपनीत नोकरी दिली होती. मात्र सुरज वारंवार दांडी मारत होता, यामुळे अमोलने त्याला समज दिली होती. “पुन्हा असं केलंस तर तुला कामावरून काढून टाकायला मालकाला सांगेन,” असे अमोलने म्हटल्याचे समजल्यावर सुरजच्या मनात राग साचला.
२६ ऑक्टोबर रोजी नाईट शिफ्टमध्ये काम संपल्यानंतर अमोल मशीनजवळ झोपला होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास सुरजने मशीनचा लोखंडी रॉड घेऊन अमोलच्या डोक्यात सपासप २६ वार केले. इतके की त्याच्या कवटीचे तुकडे झाले. हा प्रकार पाहणारा होले नावाचा कर्मचारी घाबरून मॅनेजरकडे धावला.
मॅनेजर व अन्य कामगार पोहोचल्यावर आरोपीनेच सांगितले, “अँम्ब्युलन्सला नाही, पोलिसांना बोलवा… मी एवढा मारला आहे की तो वाचणार नाही.” अमोलचा मृतदेह उचलताना त्याच्या डोक्याचे तुकडे खाली पडत होते. कोंढवा पोलिसांनी सुरज फाळके याला अटक केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात सहाय्यक सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी १४ साक्षीदार तपासले. कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज, आरोपीच्या कपड्यावरील रक्त, हत्यारावरील रक्ताचे डाग, हे महत्त्वाचे पुरावे सादर करण्यात आले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी सुरज फाळके याला जन्मठेप, २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास यशस्वीरीत्या हाताळल्याबद्दल पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे (सध्या वाहतूक शाखा), कोर्ट पैरवी अधिकारी महेश जगताप व हवालदार माने यांना प्रत्येकी १० हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.

 
			

















