४१ लोकांना घातला गंडा, संचालकासह चौघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खासगी कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून ४१ गुंतवणूकदारांची तीन कोटी ४८ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी खासगी कंपनीच्या संचालकासह ठेवी गोळा करणाऱ्या प्रतिनिधींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी आत्मनिर्भर कॉन्स्पेट्स इंडिया प्रा. लि.चे संचालक कुश चतुर्वेदी, रचना हरीश श्रोंगे (दोघे रा. उंड्री), मंजुषा शशिकांत क्षीरसागर आणि शशिकांत क्षीरसागर (दोघे रा. बोपोडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशिष दत्तात्रय पांडे (वय ४२, रा. शांतिरक्षक सोसायटी, येरवडा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुश चतुर्वेदी हा आत्मनिर्भर कॉन्स्पेट्स इंडिया प्रा. लि. कंपनीचा संचालक आहे. रचना श्रोंगे, मंजुषा क्षीरसागर आणि शशिकांत क्षीरसागर हे कंपनीत प्रतिनिधी म्हणून काम करत होते.
साखळी पद्धतीने गुंतवणूक केल्यास दरमहा ८ ते ९ टक्के व्याज दराने परतावा देण्याचे आमिष चतुर्वेदी यांनी दाखवले होते. त्यानंतर तक्रारदार पांडे यांच्यासह ४० गुंतवणूकदारांनी कंपनीत तीन कोटी ४८ लाख ९२ हजार रुपये गुंतवले.
रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना परतावा मिळाला नाही. परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी चौकशी केली असता, चतुर्वेदी यांनी टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
फसवणूक, तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियमाच्या कलम ३ आणि ४ अन्वये (एमपीडीए) चतुर्वेदीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जानराव तपास करत आहेत.
