मोहोळ टोळीतील वाँटेड गुन्हेगाराकडून एक पिस्तुल, २ जिवंत काडतुसे जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गुंड शरद मोहोळ यांच्या खुनाचा बदला घेण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. याप्रकरणी वाँटेड असलेल्या शरद मोहोळ यांच्या तिसऱ्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अटक केली आहे.
ओंकार सचिन मोरे (वय २३, रा. मुठा कॉलनी, सुतारदरा, कोथरूड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. ओंकार मोरे याच्यावर अपहरण, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. शरद मोहोळ यांचा खून ५ जानेवारी २०२४ रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून करण्यात आला होता.
टोळी वर्चस्व आणि पूर्वीच्या वैमनस्यातून शरद मोहोळ यांचा खून झाल्याचे तपासात उघडकीस आले होते. या खुनाप्रकरणी गुन्हे शाखेने गुंड विठ्ठल पवार, गणेश मारणे, मुन्ना पोळेकर यांच्यासह १० जणांना अटक केली आहे.
त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सध्या हे आरोपी येरवडा कारागृहात आहेत. शरद मोहोळ यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
त्यावरून पोलिसांनी जानेवारी २०२५ मध्ये शरद शिवाजी मालपोटे (वय २९) आणि संदेश लहू कडु (वय २४, दोघे रा. कोथरूड) यांना खराडी परिसरातून अटक केली होती. त्यांच्याकडून २ पिस्तुल व ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती.
याबाबत खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी शरद मोहोळ यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मध्य प्रदेशातून पिस्तुले आणल्याचे सांगितले.
त्यांच्याकडून आणखी ३ साथीदारांची नावे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यांचा शोध गेले काही महिने पोलीस करत होते. गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पोलीस १९ मे रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना गोपनीय माहिती मिळाली.
त्यावरून पोलिसांनी वाँटेड असलेल्या ओंकार मोरे याला सुतारदरा येथे पकडले. त्याच्याकडून ४०,८०० रुपये किमतीचे १ गावठी बनावटीचे पिस्तुल व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
शरद मोहोळ यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आखलेल्या कटातील आणखी दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, नागनाथ राख, ओंकार कुंभार, हनुमंत कांबळे, अमोल सरडे, विनोद चव्हाण, गणेश थोरात, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेंद्र चव्हाण, नागेश राख यांनी केली आहे.
