लग्नात मनासारखा हुंडा न दिल्यामुळे सासरी होत होता छळ : पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लग्नात नवरदेवाला ४ तोळे सोने दिले आणि १० लाख रुपये खर्च करून १८ एप्रिल २०२५ रोजी लग्न लावून दिले. तरीही लग्नात मनासारखा मानपान न दिल्याच्या कारणावरून मुलीला सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून नवविवाहितेने १९ मे २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी (वय २२) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याबाबत दीपाचे वडील गुरुसंगप्पा दंडाप्पागौंडा म्यागेरी (वय ५३, रा. चाबनूर, ता. तालीकोटी, जि. विजयपूर, कर्नाटक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी पती प्रसाद चंद्रकांत पुजारी (वय २६), दीर प्रसन्ना चंद्रकांत पुजारी, सासू सुरेखा चंद्रकांत पुजारी आणि सासरे चंद्रकांत पुजारी (सर्व रा. परमानंद बिल्डिंग, सातववाडी, हडपसर; मूळ रा. निंबाळ, ता. इंडी, जि. विजयपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यागेरी आणि पुजारी या दोन्ही कुटुंबांच्या संमतीने दीपा आणि प्रसाद यांचा १८ एप्रिल २०२५ रोजी विजयपूर येथील बागेवाडीतील बसव मंगल कार्यालयात विवाह झाला. लग्नात हुंड्यासाठी प्रसादला चार तोळे सोने देण्यात आले, तसेच मानपान म्हणून १० लाख रुपये खर्च करण्यात आले.
त्यानंतर दीपा सासरी पुण्यात आली; परंतु दुसऱ्याच दिवसापासून प्रसाद आणि त्याची आई सुरेखा लग्नात भांडी-कुंडी, फ्रीज दिले नाहीत, मानपान केला नाही, या कारणांवरून वाद घालू लागले आणि तिला शिवीगाळ करू लागले. दीपाने हे वडिलांना फोनवरून सांगितले. त्यानंतर तिचे भाऊ पुण्यात येऊन तिला माहेरी घेऊन गेले.
यानंतर सासरे चंद्रकांत पुजारी हे गावी आले. “आम्ही मुलाला समजावून सांगतो,” असे म्हणत त्यांनी दीपाला पुन्हा सासरी नांदविण्यास नेले. १८ मे रोजी दीपाने वडिलांना कॉल करून रडत “मला कसल्या घरात दिलं?” असे विचारले.
नवरा प्रसाद परत लग्नात भांडी-सामान दिले नाही, या कारणावरून तो, दीर, सासू आणि सासरे शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचे तिने सांगितले. वडिलांनी तिची समजूत काढत “मी पुण्याला येतो, वाद सोडवतो,” असे सांगितले.
मात्र पुढे वाद सोडवण्याची वेळच आली नाही. १९ मे रोजी दीपाने सातववाडीतील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख तपास करीत आहेत.
