मुंबईत पावसाचा धुमाकूळ : भुयारी मेट्रोमध्ये पाणी शिरल्याने हाहाकार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गोव्यासह कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने पुणे, मुंबई, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर केले आहे.
मुंबईत मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. दुसरीकडे अॅक्वा लाईनवरील भुयारी रेल्वे मार्गात पाणी शिरले आहे. आचार्य चौक व वरळी येथील मेट्रो स्थानकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.
भुयारी मार्गातील रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. त्यामुळे भुयारी रेल्वे सेवा बंद करण्याची वेळ आली आहे. पुणे शहरासह परिसरात रविवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरु होता. सोमवारी दुपारी पावसाचा जोर कमी झाला.
जिल्ह्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. मॉन्सूनने मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, महाराष्ट्र, कर्नाटकातील काही भागांत आज प्रवेश केला आहे. मुंबई, बेंगळुरू तसेच तामिळनाडूच्या उर्वरित भागांतही मॉन्सूनने प्रवेश केला आहे.
बंगालच्या उपसागरासह मॉन्सूनने मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश तसेच आसाम आणि मेघालयाच्या काही भागांतही प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातील तळकोकण व गोव्यात ५ जून रोजी सर्वसाधारणपणे मॉन्सूनचे आगमन होते.
मात्र, यंदा २५ जूनलाच त्याचे आगमन झाले. त्यानंतर एका दिवसातच मॉन्सूनने आणखी पुढचा टप्पा गाठत मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत १० जूनला तर मुंबईत साधारणतः मॉन्सून येतो.
यंदा मात्र २६ जूनलाच मॉन्सूनने निम्म्या राज्यात प्रवेश केला आहे. लोणावळ्यात २३६ मिमी पावसाची नोंद मॉन्सूनच्या आगमनाबरोबर राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. लोणावळ्यात गेल्या २४ तासांत तब्बल २३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे येथून उगम पावणाऱ्या उल्हास नदीला पूर आला आहे.
