मांजरा फाऊंडेशन पुरस्कृत कै. माधवराव शिंदे शैक्षणिक संस्थेचा उपक्रम : अण्णाभाऊ साठे सभागृहात सोहळा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मांजरा फाऊंडेशन पुरस्कृत कै. माधवराव शिंदे शैक्षणिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘कर्तृत्ववान स्त्री पुरस्कार’ यंदा कमलाबाई मिश्रीमल राठी यांना प्रदान करण्यात आला. अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.
कमलाबाई राठी यांच्या अनुपस्थितीत त्यांचा मुलगा जुगल राठी आणि मुलगी उषा राठी यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख पाच हजार रुपये असे होते.
आपली स्वप्ने बाजूला ठेवून मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सातत्याने झटणाऱ्या स्त्रिया समाजाचा कणा आहेत.
त्यांच्या विश्वास, त्याग आणि समर्पणातून अनेक घडलेली व्यक्तिमत्त्वे समाजाला लाभली आहेत. समाजातील अशा कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान व्हावा या उदात्त हेतूने स्व. इंदिराबाई निवृत्ती गव्हाणे यांच्या स्मरणार्थ मांजरा फाऊंडेशन पुरस्कृत कै. माधवराव शिंदे शैक्षणिक संस्थेच्या वतीने या पुरस्काराची संकल्पना साकारण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनकडून देण्यात आली.
या पुरस्काराचे यंदाचे पहिलेच वर्ष होते. सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कदम, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त सुचिता पानसरे, कै. माधवराव शिंदे शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शंकर शिंदे, मांजरा फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक गव्हाणे आणि सचिव राम कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















