अमेरिकन नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सायबर फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे पोलिसांनी खराडी येथील प्राईड आयकॉन इमारतीच्या ९व्या मजल्यावर सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा भंडाफोड केला आहे. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून त्यांच्याकडून क्रिप्टो करन्सी आणि अॅमेझॉन गिफ्ट व्हाउचर्स मागवून सायबर फसवणूक केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी १२३ जणांना ताब्यात घेतले असून, ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
‘मॅग्नेटल बीपीएस अँड कन्सल्ट्स एलएलपी’ या नावाने चालवल्या जाणाऱ्या या बनावट कॉल सेंटरमधून इंटरनेटच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना कॉल करून त्यांच्या अॅमेझॉन खात्याचा गैरवापर झाला आहे, त्यात ड्रग्सची तस्करी झाली आहे, अशा बहाण्याने भीती दाखवली जात होती.
त्यानंतर ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत नागरिकांना गिफ्ट कार्ड खरेदी करायला लावले जात होते, तसेच क्रिप्टो करन्सीद्वारे पैसे मागवले जात होते. हे कॉल सेंटर जुलै २०२४ पासून सुरू असून, दररोज अंदाजे ३० ते ४० हजार डॉलर्सची फसवणूक होत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी सरजितसिंग गिरावतसिंग शेखावत (रा. खराडी, मूळ रा. झुंझुनू, राजस्थान), अभिषेक अजयकुमार पांडे, श्रीमय परेश शहा, लक्ष्मण अमरसिंग शेखावत, अॅरोन अरुमन ख्रिश्चन (सर्व मूळ रा. अहमदाबाद, गुजरात) यांना अटक करण्यात आली आहे.
यातील मुख्य सूत्रधार करणसिंग शेखावत, संजय मोरे आणि केतन रवानी हे तिघे अद्याप फरार आहेत. सायबर पोलिस व गुन्हे शाखेला कॉल सेंटरबाबत माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी ६ ते पहाटे २ या वेळेत हे कॉल सेंटर कार्यरत असल्याचे समजले.
त्यानुसार रात्री साडेदहा वाजता ३० पोलीस अधिकारी आणि १५० अंमलदारांनी छापा टाकला. त्यावेळी १११ पुरुष व १२ महिला असे एकूण १२३ कर्मचारी कार्यरत होते. पोलिसांनी त्यांना जागेवरच थांबवून त्यांचे लॅपटॉप तपासले.
तपासादरम्यान लॅपटॉपमध्ये संशयास्पद अॅप्लिकेशन्स, व्हीपीएन सॉफ्टवेअरचा वापर आणि कॉलर माईकद्वारे अमेरिकन नागरिकांशी थेट संपर्क साधल्याचे आढळले.या कर्मचाऱ्यांना १ लाख अमेरिकन नागरिकांचा डेटाबेस देण्यात आला होता.
त्यांच्या वय, व्यवसाय, वैयक्तिक माहितीनुसार स्क्रिप्ट तयार करून कॉल करत फसवणूक केली जात होती. स्क्रिप्ट इंग्रजीत असून प्रत्येक कर्मचाऱ्याला ती शिकवली जात होती. छाप्यात १३ लाख ७४ हजार रुपयांचे ६४ लॅपटॉप, ४१ मोबाईल, ४ राऊटर, कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे, स्क्रिप्टची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.
कॉल सेंटर चालवलेली जागा भाड्याने घेतलेली होती. सर्व कर्मचाऱ्यांची ओळख आधार कार्डद्वारे पटवून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे, वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे, शब्बीर सय्यद, अजय वाघमारे, प्रताप मानकर, वाहिद पठाण, आशिष कवठेकर, तुषार भोसले, संतोष तानवडे, राम दळवी, वैभव मगदुम, कैलास चव्हाण, अविनाश इंगळे, विजय पवार, बाळासाहेब सकटे, निलेश जाधव, विशाल इथापे, देविदास वांढरे, अमित जमदाडे, ऋषिकेश व्यवहारे, निखिल जाधव, सीमा सुडीत, स्मिता हंबीर, जान्हवी मंडेकर, संदीप पवार, मांढरे, दिनेश मरकड, सचिन शिंदे, प्रवीण रजपूत यांनी सहभाग घेतला.

 
			


















