अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे घर जेसीबी लावून केले जमीनदोस्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : उत्तर प्रदेशात योगी सरकारने गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर कारवाईचा धडाका लावून देशभरात कारवाई म्हणजे काय असते, हे दाखवून दिले. पहलगाम येथील हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांची घरे सरकारने बुलडोझर लावून जमीनदोस्त केली. पुणे पोलिसांनी या कारवायांपासून स्फूर्ती घेऊन असेच त्रासदायक ठरणारे ठिकाण जेसीबी लावून जमीनदोस्त केले आहे.
कात्रज येथील सच्चाई माता मंदिराजवळील गगनगिरी कमानीजवळ साईनगरमधील गल्ली क्रमांक ३ येथील इमारतीसारख्या घराचे आरसीसी बांधकाम आंबेगाव पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने जेसीबी लावून अनधिकृत घोषित करत पाडले. त्याचबरोबर बाजूचे पत्र्याचे शेडही पाडण्यात आले.
या बाबत आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी सांगितले की, या ठिकाणी काही महिला बेकायदेशीरपणे अवैध दारू विक्री करत होत्या. या ठिकाणी पोलिसांनी वारंवार कारवाई केली होती.
दारूचे अनेक कॅन जप्त करण्यात आले. या महिलांवर वेळोवेळी कारवाई झाली. तरीही त्या पुन्हा तेथे येऊन अवैध दारू विक्री करत असल्याचे आढळून आले होते. तेथे अनधिकृतपणे आरसीसी बांधकाम करण्यात आले होते.
त्यामुळे या अनधिकृत घरावर महापालिकेच्या सहाय्याने जेसीबी लावून हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. तसेच शेजारील पत्र्याचे शेडही पाडण्यात आले.
