दारूच्या नशेत केले कृत्य : उपचार सुरू असताना वडिलांचा मृत्यू, पर्वती पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून मुलाने आपल्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. उपचार सुरू असताना वडिलांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पर्वती पोलिसांनी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
रवींद्र उद्धव भालेराव (वय ६१, रा. दांडेकर पूल, सिंहगड रोड) असे मृत वडिलांचे नाव आहे. पोलिसांनी सागर रवींद्र भालेराव (वय २७, रा. दांडेकर पूल) याला अटक केली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक इसराईल दगडू शेख यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र भालेराव व त्यांचा मुलगा सागर भालेराव हे दोघे सुतारकाम करत होते. सागर याचा विवाह झाला असून त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. तो दारूच्या नशेत घरातील लोकांशी भांडण करून नेहमी त्रास देत असे.
७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दोघेही कामावरून घरी आल्यानंतर सागरने दारूच्या नशेत वडिलांना शिवीगाळ केली. त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने मोटारसायकलच्या टाकीतून पेट्रोल काढून ते एका प्लास्टिकच्या बाटलीत भरले. रवींद्र भालेराव खाली बसलेले असताना त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले.
त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी धावत येऊन पाणी टाकून आग विझवली. त्यांची पत्नी विद्या व मुलगी दीपाली भालेराव यांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रवींद्र भालेराव ४५ टक्के भाजल्याचे सांगितले.
त्यांच्यावर उपचार सुरू असताना ११ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पावणे एक वाजता त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत सागर भालेराव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महाले पुढील तपास करत आहेत.

















