नर्हेतील श्री ज्वेलर्समधील प्रकार : पोलिसांनी दरोड्याचा बनाव केला होता उघड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आपल्याच चुलत भावाच्या मदतीने सराफी दुकानावर दरोडा टाकण्याचा बनाव घडवून आणणारा सराफ विष्णु दहिवाळ याने सुवर्ण भिशी योजनेत गुंतवणुकीच्या आमिषाने ३७ जणांची ४२ लाख रुपये व २१ तोळे सोने घेऊन फसवणूक केली असून तो फरार झाला आहे. दहिवाळ पती-पत्नी पसार झाले असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला आहे.
‘श्री ज्वेलर्स’ या सराफी पेढीचा मालक विष्णु सखाराम दहिवाळ आणि त्याची पत्नी स्वाती विष्णु दहिवाळ (रा. रायकर मळा, धायरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जरी हा गुन्हा ४२ लाख रुपयांचा दाखल झाला असला तरी त्याने धायरी, नर्हे परिसरातील लोक व व्यापाऱ्यांना ५ ते ६ कोटी रुपयांना गंडा घातल्याचे सांगितले जाते.
धायरीत दहिवाळ यांची ‘श्री ज्वेलर्स’ सराफी पेढी आहे. त्यांनी सुवर्ण भिशी योजना जाहीर केली होती. फिर्यादी व त्यांच्या पत्नीने या योजनेत १ लाख ३० हजार रुपये गुंतवले होते. फिर्यादीने १८ ग्रॅम वजनाचे गंठण मोडले. त्यातून आलेले १ लाख ९ हजार रुपये आणि आणखी १ लाख रुपये ऑनलाईन व रोख स्वरूपात दहिवाळ याच्याकडे दिले होते. चार तोळ्यांचे गंठण घेण्यासाठी त्यांनी एकूण ३ लाख ३९ हजार रुपये जमा केले होते.
२५ मे रोजी फिर्यादी सराफी पेढीत गेले असता, पेढी बंद असल्याचे सांगण्यात आले. चौकशीअंती दहिवाळ दाम्पत्य पसार झाल्याचे समजले. यानंतर त्यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. फिर्यादीसह एकूण ३७ जणांनी सुवर्ण भिशी योजनेत पैसे गुंतवले होते. दहिवाळ दाम्पत्याने एकूण ४२ लाख ७८ हजार रुपये आणि २१ तोळे सोन्याची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
यापूर्वी, १५ एप्रिल रोजी विष्णु दहिवाळ याने आपल्या चुलत भावाला हाताशी धरून बनावट पिस्तुलाचा वापर करून दरोडा पडल्याचे भासविले होते. नांदेड सिटी पोलिसांनी दरोडा टाकलेल्यांना पकडल्यानंतर या प्रकाराची पोलखोल झाली.
दरोडा आणि बनावट दागिने चोरीची योजना विष्णु दहिवाळ यानेच रचल्याचे निष्पन्न झाले होते. आपण कर्जबाजारी झाल्यामुळे देणेकऱ्यांचा ससेमिरा टाळण्यासाठीच चुलत भावाला दरोडा टाकण्यास सांगितल्याची कबुली त्याने दिली होती.
याबाबत नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी सांगितले की, विष्णु दहिवाळ याने दिलेली दरोड्याची फिर्याद खोटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यातील ४ पैकी ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयात यासंबंधी अहवाल सादर केल्यानंतर गुन्हा रद्द करण्यात आला. आरोपींना जामिनावर सोडण्यात आले आहे. त्यानंतर विष्णु दहिवाळ फरार झाला आहे.
तरीही बसत होता दुकानात
दरोड्याचा बनाव उघड झाल्यानंतर दोन दिवसांनीही तो दुकानात येऊन बसत असे. त्यामुळे दरोड्याचा बनाव उघडकीस आल्यानंतरही त्याला दुकानात पाहून, आणि इतकी वर्षे त्याच्याकडील भिशी योजनेत पैसे गुंतवले असल्यामुळे नागरिकांचा त्याच्यावर विश्वास राहिला. मात्र, २० मेनंतर त्याने दुकान बंद करून पलायन केले.
