महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन, सेवा सहयोग फाउंडेशन, ईनरव्हील क्लब, पुणे इंपिरियल यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेशभाई शहा, कार्यकारी संचालक परवेझ बिलीमोरिया, काश्मिरा ठाकर तसेच दृष्टीबाधित पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. मंगळवार, दिनांक २४ जून २०२५ रोजी झालेल्या या कार्यक्रमात दृष्टीबाधित व्यक्ती आणि विद्यार्थ्यांनी या बहुमोल मदतीबद्दल मनोगत व्यक्त केले.
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इयत्ता पहिलीपासून ते कॉलेजपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येते. पुणे आणि परिसरातील अनेक दृष्टीबाधित व्यक्ती व विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे. द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन ही सामाजिक संस्था १९५२ पासून दृष्टीबाधित व्यक्तींच्या कल्याणासाठी कार्यरत आहे.
दृष्टीबाधित व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेमार्फत दृष्टीबाधित निराधार महिलांसाठी मोफत वृद्धाश्रम, १८ ते ३५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत टेक्निकल ट्रेनिंग सेंटर, डोळ्यांच्या विविध आजारांवरील उपचारासाठी अद्ययावत हॉस्पिटल इत्यादी विविध प्रकल्प राबविले जात आहेत. महाराष्ट्र तसेच भारतातील अनेक दृष्टिहीन व्यक्ती संस्थेच्या या प्रकल्पांचे लाभार्थी आहेत.
