लाच लुचपत प्रतिबंधकची पुण्यात दोन ठिकाणी कारवाई : दोघांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : घर खरेदीखताची प्रत काढून देण्यासाठी तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे केलेल्या तक्रार अर्जाची फाईल शोधून देण्यासाठी लाच मागणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. मामलेदार कचेरीतील तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली १ यांच्या कार्यालयात खासगी रायटर अनिता विनोद रणपिसे (वय ५४, रा. जेजुरी जकातनाका, सासवड) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत ४५ वर्षीय तक्रारदारांना घर तारण ठेवून त्यावर कर्ज काढायचे होते. ते कर्ज काढण्यासाठी बँकेत दिलेल्या अर्जासोबत त्यांना त्यांच्या १९८७ मधील घराच्या खरेदीखताची प्रत आवश्यक होती.
ही प्रत मिळविण्यासाठी त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली १ यांच्याकडे अर्ज केला होता. तक्रारदार हे आवश्यक खरेदीखताची प्रत मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयात अर्ज घेऊन गेले असता, तेथे उपस्थित असलेल्या अनिता रणपिसे यांनी खरेदीखताची प्रत काढून देण्यासाठी तक्रारदारांकडे कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी ५ हजार रुपये आणि स्वत:साठी १ हजार रुपये अशी एकूण ६ हजार रुपयांची लाच मागितली.
त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला २६ जून रोजी मिळाली होती. त्या अनुषंगाने २७ व ३० जून रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, अनिता रणपिसे यांनी ६ हजार रुपयांची मागणी करून त्यापैकी अॅडव्हान्स म्हणून ३ हजार रुपये द्या आणि काम झाल्यावर उर्वरित द्या, असे म्हणून लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार १ जुलै रोजी हवेली तहसील कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत सापळा रचण्यात आला. अनिता रणपिसे यांनी तक्रारदाराकडून ६ हजार रुपये स्वीकारून त्यातील १ हजार रुपये तक्रारदाराला परत केले.
लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनिता रणपिसे हिला पकडले असून, खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे. पोलीस उपअधीक्षक भारती मोरे अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या सापळा कारवाईत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील वरिष्ठ लिपिक योगेश दत्तात्रय चवंडके (वय ३६) याला अटक केली आहे. एका ५८ वर्षीय तक्रारदारांचा २०२२ मध्ये मोटार अपघात झाला होता. परंतु, संबंधित विमा कंपनीने अपघाताची नुकसानभरपाई देण्यास नकार दिला होता.
या निर्णयाविरोधात त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे अपील दाखल केले होते. योगेश चवंडके हे आयोगामध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. या केसच्या सुनावणीसाठी मागील तारखेस तक्रारदार आयोगाच्या कार्यालयात हजर झाले असता, त्यांनी दाखल केलेल्या केसची फाईल गहाळ झाली असून सापडत नाही, असे चवंडके यांनी सांगितले.
तक्रारदाराने अधिक विचारणा केली असता, चवंडके यांनी केसची फाईल शोधून पटलावर ठेवण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितली. या तक्रारीची पडताळणी २६ जून रोजी करण्यात आली, त्यात लिपिकाने फाईल शोधून ठेवल्याचे सांगून त्या बदल्यात दीड हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर १ जुलै रोजी चवंडके यांनी तक्रारदाराला फाईल शोधून ठेवली असल्याचे सांगितले आणि नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात असलेल्या चहाच्या कॅन्टीनजवळ बोलावले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तक्रारदाराकडून दीड हजार रुपये घेताना योगेश चवंडके याला रंगेहाथ पकडले.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. हा तपास पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत.
