टिपू पठाणच्या फरार साथीदाराला काळेपडळ पोलिसांनी केले जेरबंद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हॉटेल मालकाला धमकावून मी सांगेल त्या दुकानातून खरेदी करायला भाग पाडून दरमहा ५ हजार रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी टिपू पठाण व त्याच्या टोळीवर तिसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काळेपडळ पोलिसांनी टिपू पठाणच्या फरार असलेल्या साथीदाराला जेरबंद केले.
फैजान ऊर्फ पच्चीस रमजान ऊर्फ कादर शेख (वय २१, रा. सय्यदनगर, मोहम्मदवाडी) असे अटक केलेल्या साथीदाराचे नाव आहे. रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण व त्याच्या टोळीवर जागा बळकावून खंडणी उकळण्याच्या दोन गुन्ह्यांमध्ये यापूर्वी मोक्का कारवाई करण्यात आली होती.
वेळेत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न केल्याने या मोक्का प्रकरणात न्यायालयाने टिपू पठाण व त्याच्या साथीदारांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर काळेपडळ पोलीस ठाण्यात टिपू पठाण व त्याच्या टोळीविरुद्ध १६ फेब्रुवारी २०२६ रोजी तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
टिपू पठाण व त्याच्या ७ साथीदारांनी सय्यदनगरमधील ख्वाजा मंजिल येथील कार्यालयात हॉटेल मालकाला बोलावून माझ्या भागीदारीतील दुकानातून खरेदी करण्यास सांगितले. हॉटेल सुरू ठेवायचे असेल तर दरमहा ५ हजार रुपये खंडणी देण्याची मागणी केली. जवळपास वर्षभर दरमहा ५ हजार रुपये खंडणी उकळण्यात आली होती.
या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) कलमाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपी फैजान ऊर्फ पच्चीस रमजान ऊर्फ कादर शेख हा सय्यदनगर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. काळेपडळ पोलीस ठाण्यातील तपास पथकाने सापळा लावून त्याला पकडले. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार राजेंद्र वाघमारे, दादासो नाळे, काळभोर, लाहिगुडे, परशुराम पिसे, अमोल फडतरे, सय्यद, पोलीस अंमलदार शाहीद शेख, विशाल ठोंबरे, काळे, अतुल पंधरकर, तांबोळी, शिंदे, बेडीस्कर, जगदाळे, परदेशी यांनी केली आहे.



















