कात्रजहून आलेल्या ट्रकचे नियंत्रण सुटले : सिग्नलला थांबलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यु
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बंगळुरू–मुंबई बाह्यवळण महामार्गावर नवले पुल परिसरात भरधाव ट्रकने सिग्नलला थांबलेल्या सहा वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
मृत दुचाकीस्वाराचे नाव आशफाक हनीफ चौधरी (वय ३५, रा. अश्रफनगर, कोंढवा) असे आहे. याप्रकरणी त्यांचे भाचे अल्ताफ लियाकतअली भेलमे (वय ३०, रा. अश्रफनगर, कोंढवा) यांनी नर्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालक शंकर गोपळाराव मेडेबने (वय ३३, रा. बसवकल्याण, कर्नाटक) याला अटक केली आहे.
हा अपघात शुक्रवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या सिग्नलवर घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातून फरशी घेऊन मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक कात्रज बोगद्याकडून येत होता. नवले पुल परिसरातील तीव्र उतारावर ट्रकचे नियंत्रण सुटले.
त्यामुळे सिग्नलला थांबलेल्या वाहनांना ट्रकने एकामागोमाग धडक दिली. या अपघातात सहा वाहनांचे मोठे नुकसान झाले. आशफाक चौधरी हे डीएसके येथे चालक म्हणून काम करत होते. ते दुचाकीवरून कामावर जात असताना ट्रक त्यांच्या दुचाकीवरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच नर्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण करत आहेत.















