धानोरीतील ग्रेफ सेंटरमधील घटना : लागोपाठ दोन दिवस एकच उमेदवार दोघांच्या नावाने देत होता परीक्षा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : लष्करातील कुक पदासाठीच्या लेखी परीक्षेत तोतयागिरी करून डमी उमेदवार म्हणून परीक्षा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्सचे कमलू उमाकांत नारायणासा यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी साहिल करणसिंग (वय २३, रा. थुआ, ता. अलेवा, जि. जिंद, हरियाना) आणि शिवा राजकुमार (वय २३, रा. उरावर, ता. शेषागंज, जि. फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. हा प्रकार धानोरी रोडवरील भैरवनगर येथील ग्रेफ सेंटर बीआरओ येथे १२ मार्च रोजी सकाळी सहा ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरवनगर येथील ग्रेफ सेंटर बीआरओ गेट येथे एमएसडब्ल्यू कुक वर्ग-३ पदासाठी लेखी परीक्षा घेतली जात आहे. १२ मार्च रोजी ७६६ उमेदवार लेखी परीक्षेसाठी आले होते. परीक्षेची बायोमेट्रिक पद्धतीने तपासणी केली जाते. उमेदवारांचे ओळखपत्र पाहून खात्री करून त्यांना परीक्षेसाठी रूममध्ये पाठविण्यात आले. रिक्रुटिंग बटालियनचे कमांडर पी. अरविंद हे उमेदवारांचे ओळखपत्र तपासून त्यांना परीक्षेस बसवत होते.
पी. अरविंद यांच्या निदर्शनास आले की काही उमेदवार डमी उमेदवार म्हणून परीक्षेस आलेले आहेत. त्यांनी त्या उमेदवारांना बाजूला घेऊन चौकशी केली. त्यात डुमरखा खुर्द (जिंद, हरियाना) या उमेदवाराच्या जागी डमी उमेदवार म्हणून साहिल करणसिंग बसला होता. तसेच उमेदवार प्रमोद कुमार यांच्या नावाने शिवा राजकुमार हा डमी उमेदवार म्हणून बसला होता.
तसेच शिवा राजकुमार याने १० मार्च रोजी बीआरओमधील एमएसडब्ल्यू कुक या परीक्षेत राजीव अशोक कुमार यादव (वय २०, रा. उरावर, ता. सिरसागंज, जि. फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) या उमेदवाराच्या नावाने डमी उमेदवार म्हणून बसल्याचेही दिसून आले. दुसऱ्याच्या नावाने परीक्षा देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या दोघांना विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक लाखे पुढील तपास करीत आहेत.




















