वाढदिवसानिमित्त शिष्यवृत्ती, आरोग्य तपासणी आणि सामाजिक उपक्रमांची घोषणा
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : विजय भंडारी यांचा ५८ वा वाढदिवस आशापुरा माता मंदिर येथे साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आरोग्य तपासणी आदी विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली. उपाध्याय प. पू. गुरुदेव श्री प्रवीणऋषिजी म. सा. यांनी वाढदिवसानिमित्त विजय भंडारी यांना आशीर्वाद दिला.
आशापुरा माता मंदिर ट्रस्ट, जीतो, लायन्स क्लब, युगल धर्म संघ आदी मित्रपरिवाराच्या वतीने विजय भंडारी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आशापुरा माताची आरती करण्यात आली. केक कापण्यात आला आणि उपस्थित मान्यवरांनी विजय भंडारी यांचे अभिष्टचिंतन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम खंडेलवाल यांनी केले. तर, कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी चेतन भंडारी, मंगेश कटारिया, जिनेन्द्र लोढा, दिलीप मुणोत, बाळासाहेब बोरा आदींनी सहकार्य केले. प. पू. प्रवीणऋषीजी म. सा. म्हणाले की, आपण लोक आनंद मिळवण्यासाठी जगतो. परंतु, काही लोक गौरवासाठी असतात.
त्यांचे कार्य समाजाला परिपूर्णतेकडे नेणारे असते. अशा व्यक्तींमध्ये विजय भंडारी येतात. जीतो, युगल धर्म संघ, लायन्स क्लब आणि इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून समाजासाठी सुरु असलेले विजय भंडारी यांचे काम कौतुकास्पद आहे. नवीन पिढीसाठी ते आदर्श काम आहे. म्हणून त्यांचा गौरव होणे आवश्यक आहे.
यापुढील आयुष्यात अनेक गौरव त्यांनी प्राप्त करावेत, अशा शब्दांत प. पू. प्रवीणऋषीजी म. सा. यांनी विजय भंडारी यांना आशीर्वाद दिले. विजय भंडारी म्हणाले की, समाजासाठी काम करायचे असेल तर, लोकांचे आशीर्वाद पाहिजेत.
आपला परिवार सोबत असावा लागतो. मित्र परिवार ही तुमची ताकद असते. आणि ते मित्र चांगले असतील तर चांगले मार्ग सापडतात आणि त्यावरचा प्रवास आनंददायी व यशस्वी होत असतो. कोणीही व्यक्ती एकटा कार्य करू शकत नाही. त्यासाठी टीम लागते आणि त्यात योग्य माणसांची निवड आपल्याला करता यायला हवी.
किती वर्षे जगायचं हे महत्वाचं नाही तर, कसं जगायचं हे महत्त्वाचं आहे. प. पू. प्रवीणऋषीजी म. सा. मुळे मी सामाजिक जीवनात कार्य सुरू केले. आणि जीतो मध्ये रसिकलाल धारिवाल यांच्यामुळे आलो, असे विजय भंडारी यांनी यावेळी सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले की, जैन समाजाशी माझा अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहे. समाजातील वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जैन समाजाकडून खूप मोलाचे काम होत आहे.
विजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये स्वच्छता अभियानाचा समावेश करून आपल्या परिसरातील नदी, नाले, ओढे स्वच्छ राखण्यासाठी काम करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड च्या वतीने विजय भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली. यामध्ये 250 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, 58 आरोग्य तपासणी शिबिरे, वाहतूक पोलिसांना 1200 हेल्मेटांचे वितरण, 10 शिवण मशीन, 4 डायलिसिस मशिन्स, 1 डायग्नोस्टिक सेंटर आणि गुरुनानक शाळेला बेंच भेट देण्याच्या उपक्रमांचा समावेश आहे.
