संजय गाढवे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील ज्येष्ठांचा सत्कार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : गुरुपौर्णिमेनिमित्त साहील बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गुरुवारी (दि. १० जुलै) शहरातील विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ गुरुजनांचा आणि मान्यवरांचा सन्मान सोहळा पार पडला. हा कार्यक्रम साहील कॉम्प्लेक्स येथे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, शेती, व्यवसाय, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व नियोजन समिती सदस्या तथा माजी नगराध्यक्षा संयोगिता संजय गाढवे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमावेळी बोलताना संजय गाढवे आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणी सांगताना भावुक झाले. ते म्हणाले, “या जगात आई-वडिलांनंतर कुठलीही अपेक्षा न ठेवता आयुष्य जगण्याचा मंत्र देणारी व्यक्ती म्हणजे गुरू. आणि अशा गुरूंचा सन्मान माझ्या हस्ते होतोय, हे माझं भाग्य समजतो.”
यावेळी युवा नेते साहिल गाढवे, माजी नगरसेवक किरण जाधव, युवा उद्योजक संजय साबळे, सुरज गाढवे, माळी सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष बालाजी माळी, मुशीर शेख, रामभाऊ बागडे, महेश गपाट यांच्यासह पत्रकार अरुण देशमुख, गौस शेख, वसिम काजळेकर, मुकुंद लगाडे, अजित बागडे, अशिष बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.
