ग्राहकाचा धक्कादायक आरोप : व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, एफडीएकडे तक्रार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहरातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाण म्हणून ओळखले जाणारे गुडलक कॅफे सध्या एका गंभीर आरोपामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. एका ग्राहकाने येथे दिलेल्या ‘बन मस्का’मध्ये काचांचे तुकडे आढळल्याचा धक्कादायक दावा करत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या घटनेमुळे पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सदर ग्राहकाने अन्न घेताना तोंडात काचांचा तुकडा लागल्याचे सांगत, तत्काळ व्हिडीओ शूट करून कर्मचारी वर्गाला जाब विचारतानाचे दृश्य टिपले. हा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या प्रकारानंतर कॅफे व्यवस्थापनाने माफीनामा जाहीर केला, मात्र ग्राहकाने त्यांच्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर एफडीए (अन्न व औषध प्रशासन) विभागाकडे ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली असून, अन्न सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दररोज हजारो ग्राहकांची वर्दळ असलेल्या या कॅफेमध्ये अशा प्रकारची गंभीर निष्काळजीपणा उघड झाल्याने, ग्राहक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावरून एफडीएने याची तात्काळ दखल घेऊन कडक चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
