८ लाख २२ हजारांचे दागिने घेऊन केली फसवणूक : तिसरा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ओळखीतील सराफाकडून उधारीवर घेतलेल्या ८ लाख २२ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचे पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस हवालदारावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप तसेच त्याची पत्नी अश्विनी गणेश जगताप (दोघे रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गणेश जगताप याच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मनिष सुरेश सोगिग्रा (वय ४२, रा. भवानी पेठ) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे औंध येथे ‘नवकार ज्वेलर्स’ नावाचे सराफी दुकान आहे. जगताप हा पोलीस दलात असल्यामुळे सराफाशी त्याची ओळख होती. गेल्या वर्षी २१ ऑगस्ट २०२४ रोजी जगताप आणि त्याच्या पत्नीने या सराफाकडून ८ लाख २२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले होते. “पैसे नंतर देतो,” असे सांगून त्यांनी दागिने घेऊन गेले.
सराफ व्यावसायिकाने वेळोवेळी दागिन्यांचे पैसे मागितले, मात्र जगताप टाळाटाळ करू लागला. जगताप याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यानंतर संबंधित सराफाने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करांडे करत आहेत.
यापूर्वी जगतापने भवानी पेठेतील एका सराफ व्यावसायिकाकडून पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख असल्याचे भासवून दागिने खरेदी केले होते. ही बाब संबंधित सराफ व्यावसायिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर जगतापला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते.
त्यानंतर, जगतापने ओळखीतील एका महिलेकडून ७३ तोळे दागिने आणि तिच्या पतीकडून १७ लाख रुपयांची रोकड “मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी गरज आहे” असे सांगून घेतली होती. पैसे आणि दागिने परत करतो, असे सांगून त्याने त्यांची परतफेड केली नाही. फसवणुकीप्रकरणी संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर कोथरूड पोलीस ठाण्यात जगतापविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी सेवा पुस्तिकेतील शिक्षा झालेले पान लपवण्यासाठी, जगताप याने दोघा लिपिकांना हाताशी धरून त्या पानाचे कागद फाडून त्याजागी दुसरे पान चिकटवले होते. याप्रकरणी दोघा लिपिकांसह जगतापवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गणेश जगताप याच्यावर आता एकूण तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.
