डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून गंभीर जखमी : पर्वती दर्शन येथील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : “मुलगी घरातून निघून गेली” यासाठी जबाबदार धरून भावाने चुलत भावाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. पर्वती दर्शन भागात घडलेल्या या घटनेत पर्वती पोलिसांनी चुलत भावाला अटक केली आहे.
आदेश संजय काळे (वय ४१, रा. पर्वती दर्शन) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत अमित काळे (वय ४०, रा. पर्वती दर्शन) गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सुरेखा सुरेश काळे (वय ५४, रा. पर्वती दर्शन) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १६ जुलै रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेश काळे आणि अमित काळे हे चुलत भाऊ असून ते शेजारी शेजारी राहतात. आदेश काळे यांची मुलगी घरातून निघून गेली होती. त्यामुळे आदेश काळे मोठ्याने शिवीगाळ करत घराबाहेर फिरत होता. त्यावर अमित काळे यांनी, “तु कशाला शिव्या देतोस?” असे विचारले.
त्याचा राग मनात धरून आदेश काळे यांनी “तुच याला जबाबदार आहेस” असे म्हणत तेथे पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून अमित काळे यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. पर्वती पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला असून आरोपी आदेश काळे याला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले.
