चोरी करताना वापरली अक्कल हुशारी : विश्रामबाग पोलिसही निघाले सवाई, कर्नाटकातून केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सीईटीला टॉप स्कोअर केल्यामुळे कोलारमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याला फ्री सीटद्वारे थेट प्रवेश मिळाला. तेथे पहिल्या सेमिस्टरमध्ये त्याने तब्बल ९७ टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये टॉप केले. इतके सर्व काही चांगले असतानाही त्याची बुद्धी फिरली. पुण्यात येऊन त्याने सराफा दुकानात घरफोडी केली. हे करताना त्याने कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. मात्र, पोलीस त्याच्यापेक्षा सवाई निघाले. त्यांनी चोरी झाल्यानंतर मागील २-३ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून थेट कर्नाटकातील कोलार येथून या टॉपरला पकडून आणले.
लिखित जी (वय २१, रा. कोलार, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी मध्यरात्री पावणे ते सव्वा वाजेदरम्यान एका चोरट्याने दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरुमच्या खिडकीतून ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला. तेथील ४ लाख ७४ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.
आरोपीने पांढरा शर्ट, जीन्स पॅन्ट आणि काळ्या रंगाचा मास्क घातला होता. त्याच्या पाठीवर एक बॅग असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. याशिवाय कोणताही धागादोरा मिळत नव्हता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर व त्यांच्या पथकाने चोरीच्या आधीच्या दिवसातील सीसीटीव्ही तपासले.
त्यात ३ जुलैच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकजण संशयास्पदरीत्या रेकी करत असल्याचे आढळून आले. त्याचा मागोवा घेत त्यांनी सुमारे २५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचा माग काढत पोलीस नऱ्हेपर्यंत गेले. तेथून तो बसमध्ये बसल्याचे दिसून आले. त्यावरून तांत्रिक विश्लेषणाद्वारे हा आरोपी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील जंगमगुर्जनहल्ली या गावाचा रहिवासी असल्याचे समजले.
त्यानुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर, पोलीस अंमलदार अशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड या पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या घरी धाव घेतली. परंतु, तो घरी नव्हता. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने घराची झडती घेतली. त्यात चोरी करणाऱ्या संशयिताने वापरलेले सॅंडल, बॅग, तसेच इंजिनिअरिंग कॉलेजचे आयकार्ड व मोबाईल सापडले.
त्या मोबाईलमध्ये १ ग्रॅम सोन्याच्या दागिन्याचे फोटो व आरोपीच्या हातावरील जखमेचा फोटो सापडला. या वस्तू सीसीटीव्हीमधील दृश्याशी हुबेहूब जुळणाऱ्या होत्या. त्यामुळे ही चोरी याच आरोपीने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विश्रामबाग पोलीस व स्थानिक पोलिसांनी आरोपी ये-जा करत असलेल्या ठिकाणी सलग ४ दिवस सापळा लावला.
शेवटी कोलारमधील गांधीनगर येथे तो सापडला. त्याच्याकडून चोरीला गेलेला ४ लाख ७४ हजार रुपयांचा संपूर्ण माल हस्तगत करण्यात आला. न्यायालयाने अधिक तपासासाठी १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त संजय बनसोडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, आशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, अर्जुन थोरात, नितीन बाबर, सागर मोरे, प्रशांत कदम यांनी केली.
